रत्नागिरी ः संवाद आणि समजूतदारपणाचा संदेश देणारे ‘टेक अ चान्स’

रत्नागिरी ः संवाद आणि समजूतदारपणाचा संदेश देणारे ‘टेक अ चान्स’

Published on

rat15p17.jpg-
24677
रत्नागिरी ः ज्ञानज्योत शिक्षण संस्थेने सादर केलेल्या ‘टेक अ चान्स’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------

संवाद आणि समजूतदारपणाचा संदेश देणारे ‘टेक अ चान्स’
ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे सादरीकरण ; तांत्रिक बाजूसह मांडणीतील नेटकेपणा जमेचा
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक चूक म्हणजे नात्याचा शेवट नसतो. संवाद, समजूतदारपणा आणि एकमेकांवरील अढळ विश्वास याच्या जोरावर नाती पुन्हा नव्याने उभी राहू शकतात, हा सकारात्मक संदेश ‘टेक अ चान्स’ या नाटकातून देण्यात आला. ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत ‘ज्ञानज्योत शिक्षण संस्था-जालना’ या संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर केला.
लेखक मनोज ठाकूर यांनी लिहिलेली ही संहिता आजच्या काळातील करिअर आणि नातेसंबंधांमधील संघर्षावर भाष्य करणारी आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे मानसी आणि रोहित हे जोडपे, त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा, निर्माण झालेला दुरावा आणि तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे निर्माण झालेला संशयाचा फेरा, असा या नाटकाचा प्रवास आहे. मात्र, नाटकाचा शेवट हा केवळ वाईट आठवणीत न अडकता, चांगल्या क्षणांवर विश्वास ठेवून नात्याला ‘एक संधी’ देण्यावर होतो.
दिग्दर्शक रत्नदीप वाव्हळे यांच्या कल्पक दिग्दर्शनाने या प्रयोगाला अधिक उठाव दिला. नाटकातील कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तांत्रिक बाजू आणि मांडणीचा नेटकेपणा यामुळे हा प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरला.
-------
काय आहे नाटक ?
‘टेक अ चान्स’ हे नाटक आजच्या काळातील करिअर, नात्यांमधील गुंतागुंत आणि विश्वासाची कसोटी पाहणारे आहे. नाटकाची कथा मानसी आणि रोहित या तरुण आयटी प्रोफेशनल्सभोवती फिरते, जे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत.
या कथेची नायिका मानसी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी दाखविण्यात आली आहे. तिला अमेरिकेतील एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे तिचे करिअरला उच्च शिखरावर पोचणार होते. मात्र, यासाठी तिला दोन वर्षे रोहितपासून दूर राहावे लागणार असते. दुसरीकडे, रोहितला मानसीसोबतचे शांत आणि सुरक्षित आयुष्य हवे असते. विचारांमधील या तफावतीमुळे दोघांत मतभेद निर्माण होतात, तरीही मानसी आपल्या करिअरला प्राधान्य देत परदेशात जाण्याचा निर्णय घेते.
सुरुवातीला व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून असणारा संवाद काळाच्या ओघात विरळ होत जातो आणि त्यांच्यात भावनिक दुरावा निर्माण होतो. मानसीच्या विरहाने व्याकुळ झालेला रोहित एकटा पडतो. अशातच त्याच्या आयुष्यात अनु नावाची आधुनिक आणि समजूतदार मुलगी येते. एका पार्टीच्या रात्री रोहित भावनिकदृष्ट्या खचलेला असताना अनु त्याला आधार देते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ती अचानक निघून जाते आणि काही काळाने आपण गर्भवती असल्याचे सांगून गायब होते.
एक वर्षानंतर मानसी भारतात परतते. रोहित आणि मानसी पुन्हा आपले नाते सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच मानसीला अनुचा फोन येतो. अनुने ''मी आई होणार आहे'' असे सांगितल्यामुळे मानसीच्या मनात संशयाचे काहूर माजते. मानसीची मैत्रीण रेखा तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण गैरसमज इतके वाढतात की मानसी पुन्हा परदेशात जाण्याचा निर्णय घेते.
नाटकाच्या शेवटी रोहित आपल्या चुकांचे आत्मपरीक्षण करतो. तो मानसीला भूतकाळातील कटू आठवणी विसरून नात्याला ‘एक संधी’ देण्याची विनंती करतो. त्याच वेळी अनु पुन्हा समोर येते आणि एक धक्कादायक सत्य उघड करते. ती प्रत्यक्षात गर्भवती नव्हती, तर केवळ एका गैरसमजातून तिने तशी परिस्थिती निर्माण केली होती. अनु आपली चूक मान्य करून माफी मागते.
संशयाचे धुके विरल्यानंतर मानसीला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागतो. विश्वास, नातेसंबंध आणि अहंकाराचा संघर्ष उभा राहत असताना, हे नाटक प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. तुटलेले नाते सांधण्यासाठी एक दुसरी संधी द्यायला हवी का0
-----------
* सूत्रधार आणि साहाय
संगीत संयोजन ः राहूल बोरडे, प्रकाश योजना ः वाल्मिक जाधव, प्रसाद वाघमारे, रंगभूषा-वेशभुषा ः श्रृती वानखेडे, उल्का कुलकर्णी. नेपथ्य ः अमोल जाधव, राहूल बोरडे. रंगमंच व्यवस्था ः शुभम रॉय, प्रकाश ढेपले, किशोर थोरात, बाळू बटुळे, अर्जून टाकरस, प्रशांत अवसरमोल, नितीन रसाळ, रणजित बायस.
----
* पात्र परिचय
मानसी ः अंजली कुलकर्णी, रोहित ः जगदीश जाधव, रेखाः गायत्री तांगडे, अनु ः श्रृती वानखेडे, पंढरीः आशिष झिने, छोटीमुलगी ः सुकेशनी मकासरे, इंव्हेंटवाला ः सागर सोनवणे, मानसी मैत्रीण ः हर्षदा मंगलगी, इव्हेंटवाला ः अमोल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अनिल मोरे.
---------
* आजचे नाटक
नाटक ः ती ती आणि ती. सादरकर्ते ः सह प्रमुख अधिकारी शहर . वेळ ः सकाळी ११.३० वाजता. नाटक ः तांडा. सादरकर्ते ः नवोदिता चंद्रपूर ः वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com