‘आंजिवडे-पाटगाव’ घाटमार्गासाठी वज्रमूठ

‘आंजिवडे-पाटगाव’ घाटमार्गासाठी वज्रमूठ

Published on

24724

‘आंजिवडे-पाटगाव’ घाटमार्गासाठी वज्रमूठ

महादेवाचे केरवडेत बैठक; पक्षभेद विसरून ग्रामस्थांना सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित आंजिवडे - पाटगाव घाटमार्गासाठी सर्वांनी एकत्रितपणे ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून समन्वयातून काम करा; जनमताशिवाय विकास होत नाही. या घाटासाठी बेरजेचे राजकारण करूया, असे ठाम मत मान्यवरांनी व्यक्त केले. येत्या अधिवेशनापूर्वी पुढील रणनीती ठरविण्यासाठी कृती समितीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे-खिरमळावाडी येथे बाळ केसरकर यांच्या फार्महाऊसवर शनिवारी (ता. १४) सायंकाळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सगुण धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आंजिवडे घाट कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस इस्कॉनचे प्रवर्तक डॉ. विश्वनाथ सावंत, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, दीपक नारकर, सेवानिवृत्त उपअभियंता आर. के. देसाई (कोल्हापूर), ठेकेदार प्रभाकर परब, माजी सभापती मोहन सावंत, माजी उपसभापती आर. के. सावंत, साईनाथ नार्वेकर, अजित परब, आनंद मेस्त्री, राजू कविटकर, एस. पी. कोराणे, विजय सावंत, किरण गावडे, प्रमोद म्हाडगुत, सतीश कविटकर, भिवा सावंत, राजा धुरी, सुधीर गुंजाळ, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांपासून भुदरगड (जि. कोल्हापूर) आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे (जि. सिंधुदुर्ग) येथील नागरिक आंजिवडे-पाटगाव दरम्यानचा भैरीची पाणंद घाट मार्ग सुरू करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात या घाटाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले होते. सर्वेक्षणासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. घाटरस्त्याच्या दर्जोन्नती प्रस्तावाची फाईल रत्नागिरी येथील अधीक्षक कार्यालयात प्रलंबित असल्याने ती तातडीने पुढे सरकविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
------
घाटमार्गासाठी एकजूट आवश्‍यक!
सगुण धुरी यांनी आंजिवडे घाटासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. सावंत यांनी, या घाटमार्गासाठी एनजीओचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली. सेवानिवृत्त उपअभियंता आर. के. देसाई यांनी दोन्ही जिल्ह्यांतून समन्वयाची गरज व्यक्त केली. रुपेश कानडे, दीपक नारकर यांनी विचार मांडले. डॉ. सावंत, रुपेश कानडे, दीपक नारकर, सगुण धुरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अजित परब यांनी प्रास्ताविक केले. शंकर कोराणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com