ओटवणेत २० पासून ‘ध्रुव चषक’ स्पर्धा
ओटवणेत २० पासून
‘ध्रुव चषक’ स्पर्धा
ओटवणे ः ओटवणे गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळातर्फे २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान ओटवणे ग्रामपंचायत नजीक मैदानावर ‘ध्रुव चषक २०२६’ या भव्य खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकीनांना पहायला मिळणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक मालवणीसह हिंदी व मराठीत समालोचन करणार आहे. लीग पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेसाठी प्रथम १ लाख ५० हजार २ रुपये व चषक, द्वितीय १ लाख २ रुपये व चषक, तृतीय ३० हजार, चतुर्थ क्रमांकाला १५ हजार रुपयांचे पारितोषिक तसेच स्पर्धेतील मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी उदित गावकर, विशाल गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिन गावकर, आकाश मेस्त्री यांनी केले आहे.
................
उत्कृष्ट पत्रकारिता
पुरस्कार स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी ः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
....................
शिरोडा-वेळागरमध्ये
महाशिवरात्रोत्सव
वेंगुर्ले ः शिरोडा-वेळागर श्री देव लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पार पडला. हजारो भाविकांनी देवगडमधील श्री देव कुणकेश्वर देवस्थानप्रमाणे वेळागर येथील श्री देव लिंगेश्वराच्या पिंडीवर अभिषेक, बेलपत्र व फुले वाहून देवतेच्या स्वहस्ते पूजनाचा लाभ घेतला. शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात काल (ता. १५) महाशिवरात्री उत्सवानिमित्त सकाळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवतेवर अभिषेक, बेलपत्र व फुले वाहून देवतेच्या प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने पूजनाचा लाभ घेतला. सायंकाळी कीर्तन, भजने, ‘श्रीं’ची पालखी, रात्री सातपाटेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग झाला. कार्यक्रमांचा लाभ घेण्यास आलेल्या भाविकांचे श्री देव लिंगेश्वर देवस्थान समिती व सल्लागार यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.
......................
कलंबिस्त येथे
रक्तदान शिबिर
सावंतवाडी ः स्वराज्यरक्षक युवा मंडळ कलंबिस्त गणशेळवाडी व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) रक्तदान शिबिराचे आयोजन कलंबिस्त गणशेळवाडी येथे शिवाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन रवींद्र गावडे, दीपक सावंत यांनी केले आहे. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी रवीकमल सावंत यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
.......................
म्हापण गोसावीवाडीत
भंडारा उत्सवाला प्रारंभ
म्हापण ः म्हापण-गोसावीवाडी येथील सिद्धमहापुरुष मंदिरात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री भंडारा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उद्या (ता. १७) सकाळी अभिषेक, सायंकाळी सातला घटस्थापना, ७.३० वाजता भजन, रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळेचे बुवा संजय गावडे विरुद्ध आंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्लेचे बुवा विनय नांदोस्कर यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. बुधवारी (ता. १८) पहाटे ५.३० वाजता भंडारा प्रसाद, सकाळी ९ वाजता कालोत्सव, १० वाजता नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा उत्सव समिती म्हापण, गोसावीवाडी यांनी केले आहे.
........................
घारपीत २१ पासून
खुली क्रिकेट स्पर्धा
ओटवणे ः घारपी येथील श्री शिवछत्रपती कला, क्रीडा मंडळातर्फे घारपी मैदान येथे २१ व २२ फेब्रुवारीला खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५,००० रुपये, द्वितीय १०,००० रुपये तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक संघांनी ओंकार गावडे, गजानन सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवछत्रपती कला, क्रीडा मंडळाच्या वतीने सागर गावडे यांनी केले आहे.
.......................
तिरोड्यात आज
पाटेकर जत्रोत्सव
आरोंदा ः तिरोडा (ता. सावंतवाडी) गावातील गोडकर कुलस्वामी पाटेकर देवस्थानचा जत्रोत्सव उद्या (ता. १७) रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक विधी, केळी ठेवणे, दुपारी महाप्रसाद, रात्री ९ वाजता पाटेकर भजन मंडळाचे (खासेवाडी) भजन, पालखी, दारुसामान आतषबाजी व त्यानंतर मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यकंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

