मळगाव येथे शिवजयंतीनिमित्त
गुरुवारी शिवकालीन वस्तू प्रदर्शन

मळगाव येथे शिवजयंतीनिमित्त गुरुवारी शिवकालीन वस्तू प्रदर्शन

Published on

मळगाव येथे शिवजयंतीनिमित्त
गुरुवारी शिवकालीन वस्तू प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः मळगाव-रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता. १९) शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष असून, शिवकालीन इतिहास जपण्याच्या व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे. या निमित्ताने राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहातील निवडक व दुर्मीळ शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९.३० वाजल्यापासून रात्री दहापर्यंत सर्व शिवप्रेमींसाठी खुले असेल. यात मराठा आरमाराचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या तब्बल ८ जहाजांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. मराठ्यांच्या शस्त्रागारातील प्रमुख शस्त्र असलेली मराठा तोफ, शिवप्रतापाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असलेल्या अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखे व कट्यार यांच्याही प्रतिकृती प्रदर्शनात असतील. इतिहासप्रेमींसाठी मराठा आरमार ग्रंथातील २२ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, मराठा आरमारातील जहाजांवर वापरल्या जाणाऱ्या तोफांच्या प्रतिकृती, पावनखिंडीत बलिदान देणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक वंशावळ व दांडपट्टा हे विशेष आकर्षण आहे. याशिवाय शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल पेहराव दर्शविणारी दुर्मीळ छायाचित्रे, मराठा शस्त्रागारातील विविध शस्त्रे, यात विशेषतः उर्मी व दांडपट्टा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ किल्ले व दुर्गांचे छायाचित्र प्रदर्शन, ऐतिहासिक शिक्क्यांचे मजकूर, गोमंतकीय भागातील दुर्गांची माहिती, छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर, मनूची संग्रहातून छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे, ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या भव्य शिवकालीन प्रदर्शनामुळे मळगाव व पंचक्रोशीतील शिवभक्त, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी व शिवप्रेमींना शिवकालीन इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सर्व शिवभक्त व शिवप्रेमींनी भेट देऊन या ऐतिहासिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com