-घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे
फिजिओ संवाद ..........लोगो
(२८ जानेवारी टुडे ३)
घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे
‘मी दिवसभर घरात काम करते मग, मला वेगळ्या व्यायामाची काय गरज आहे ?’ हे वाक्य अनेक महिलांकडून आणि जास्त घरकाम करणाऱ्या व्यक्तींकडून नेहमीच ऐकायला मिळतं. केरकचरा, स्वयंपाक, धुणीभांडी, मुलांची काळजी या सगळ्यांमध्ये शरीर खूप प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे अनेकांना वाटतं की, घरकाम म्हणजेच व्यायाम आहे; पण खरंच घरकाम म्हणजे व्यायाम आहे का? तर याचे नेमके उत्तर नाही असेच आहे. का ते पाहूया...!
- rat१७p२.jpg-
26O25083
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT) B.P.Th.
-----
घरकामाचा मुख्य उद्देश काम पूर्ण करणे हा असतो. घर स्वच्छ करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे ही सगळी कामे करताना शरीरामध्ये असंख्य हालचाली होत असतात; मात्र या हालचाली जाणीवपूर्वक नसतात. यातील बहुतांश हालचाली या असंतुलित आणि परत परत घडणाऱ्या असतात. सतत वाकणे, पुढे झुकणे, एकाच बाजूने काम करणे, खूप वेळ उभे राहणे यामुळे शरीरावरती तणाव वाढत जातो. याउलट व्यायामाचा उद्देश शरीराची ताकद वाढवणे हा असतो. शरीर लवचिक बनवणे, वेदना टाळणे हा उद्देश मनात ठेवून व्यायाम केला जातो. व्यायामामध्ये स्नायूंना नियोजनबद्ध आणि संतुलित हालचाली दिल्या जातात. पूर्ण जाणीव ठेवून व्यायाम केला जातो. योग्य वेळ, योग्य हालचाल आणि हालचालीदरम्यान विश्रांतीचा समतोल व्यायामामध्ये असतो.
घरकाम करताना बहुतांशी लोक शरीरस्थितीकडे लक्ष देत नाहीत. झाडू मारताना पाठ वाकलेली असते, भांडी घासताना मान झुकलेली असते, स्वयंपाक करताना खांद्यावरती ताण येतो अशा अनेक कृती नकळत काम करताना घडत असतात. काम ही जाणीवपूर्वक हालचाल नसल्यामुळे त्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक दिवस रोज असे केल्याने हळूहळू मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सुरू होते. याउलट व्यायामामध्ये तंत्रशुद्ध हालचाली असतात. कोणता स्नायू किती वेळ वापरायचा, किती वेळ विश्रांती द्यायची, किती प्रमाणात व्यायाम करायचा या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार असतो. म्हणूनच व्यायाम ही जाणीवपूर्वक हालचाल आहे. त्यामुळे व्यायामाने स्नायूंची ताकद वाढवणे, शरीर मजबूत करणे या गोष्टी घडतात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियंत्रण. घरकाम कधीही आपल्या नियंत्रणात नसते. कधी जास्ती तर कधी कमी आणि कधी कधी तर थकवा आलेला असताना सुद्धा घरकाम पूर्ण करायचे म्हणून केले जाते. व्यायाम मात्र आपल्या क्षमतेनुसार केला जातो. व्यायामाचे मोजमाप केले जाऊ शकते. त्यामध्ये शरीराच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार कमी-अधिक बदल केला जाऊ शकतो.
घरकाम करताना काही ठराविक स्नायूंवर अधिक भार येतो. तेच तेच स्नायू सारखे सारखे वापरले गेल्याने हळूहळू वेदना सुरू होते. उदाहरणार्थ, केरकचरा काढताना होणाऱ्या हालचालीमुळे सुरू होणारी कोपरदुखी. व्यायामापूर्वी केले जाणारे ‘वॉर्मअप्’ आणि नंतर केले जाणारे ‘कुलडाऊन’ हे प्रकार घरकामात नसतात. व्यायामामध्ये ‘रेस्ट डे’ असतो; पण घरकामामध्ये नाही. घरकामांमधून मानसिक थकवा येतो तर व्यायामामधून मनाला ऊर्जा मिळते. त्यामुळे घरकाम केले म्हणजे व्यायाम झाला हा गैरसमज दूर केला पाहिजे. तुमच्या एखाद्या स्नायूमध्ये योग्य प्रमाणात ताकद नसेल आणि त्याला तुम्ही तेवढेच काम लावत असाल तर तो स्नायू दुखायला सुरुवात करतो. म्हणून स्नायूंची ताकद वाढवणे हे घरकाम करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. घरकामांमध्ये थोडा थोडा ब्रेक घेणे, अधेमधे स्ट्रेचिंग करणे, आहार आणि झोप व्यवस्थित ठेवणे आणि नियमित वेळ काढून व्यायाम करणे गरजेचे आहे. रोज किमान पंधरा मिनिटे काढून केलेला व्यायाम तुमच्या शरीराला ताकद आणि मनाला ऊर्जा देईल. दिवसाच्या शेवटी सर्व काम आटपल्यानंतर केलेले हलके स्ट्रेचिंग तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास आणि दुखण्यापासून लांब राहण्यास नक्कीच मदत करेल.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

