सेवा रस्ता नकाशाप्रमाणे नसल्याने आरवलीकरांची गैरसोय
आरवलीतील सेवारस्ता नकाशाबाहेरच!
विचारे, सुर्वे ः ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १७ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा पश्चिमेकडील सेवारस्ता मूळ आराखड्यानुसार आणि नकाशानुसार झालेला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, हा रस्ता तातडीने नकाशाप्रमाणे पूर्ण करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ विजय विचारे व विकास सुर्वे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला संगमेश्वरकडून माखजनच्या दिशेने जाण्यासाठी हा सेवारस्ता तयार करण्यात आला आहे; मात्र, महामार्गाच्या प्रत्यक्ष पाहणीनुसार आणि नियोजित आराखड्याप्रमाणे हा रस्ता पूर्णत्वास नेण्यात आलेला नाही. या अपुऱ्या रस्त्यामुळे महत्त्वाची कार्यालये प्रवासाच्या मुख्य प्रवाहापासून तुटली आहेत. त्यात स्टेट बँक, तलाठी मंडल कार्यालय, टेलिफोन एक्स्चेंज, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचा समावेश आहे. या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांकडे जाण्यासाठी सुटसुटीत रस्ता नसल्याने नागरिकांना आपली वाहने थेट महामार्गावरच उभी करावी लागतात. यामुळे महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आणि कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या महिला व कर्मचारी यांची मोठी कुचंबणा होत आहे. सेवारस्ता किमान भारतीय स्टेटबँकेपर्यंत तरी वाढवण्यात यावा जेणेकरून या परिसरातील सर्व कार्यालयांकडे जाणे सुलभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
----
वगळलेल्या रस्त्याची चौकशी करा
नकाशात रस्ता असूनही प्रत्यक्ष कामात तो का वगळण्यात आला, याची चौकशी व्हावी. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन जनतेचा हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती विजय विचारे आणि विकास सुर्वे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

