केळशीतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा कायापालट

केळशीतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा कायापालट

Published on

- rat१७p८.jpg-
२६O२५०९९
दापोली ः केळशी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
----
केळशी महालक्ष्मी मंदिर परिसराला नवसंजीवनी
पर्यटकांना दिल्या सुविधा; १ कोटी ३५ लाखांची विकासकामे
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १७ ः तालुक्यातील केळशी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि परिसर आकर्षक आहे. देवस्थान न्यास आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे मंदिर परिसराला नवसंजीवनी मिळाली असून, भाविकांसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. धार्मिक, पर्यावरणपूरक आणि पर्यटनदृष्ट्या सक्षम असा हा बदल केळशीच्या ओळखीत भर घालणारा ठरत आहे.
मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा न्यासाचे माजी अध्यक्ष शरद परांजपे यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आला होता. त्यानुसार बहुउद्देशीय सभागृहाची उभारणी, परिसरात पेवरब्लॉक बसवणे, वाहनतळाचे डांबरीकरण, संरक्षण भिंत बांधणे तसेच तलावाभोवती पेवरब्लॉकसह कठडा उभारणे, अशी अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तलावाभोवती फेरफटका मारण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला असून, विश्रांतीसाठी बाकांचीही व्यवस्था करण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह व पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात आली आहे तसेच आकर्षक बगिच्यामुळे परिसराला नवचैतन्य लाभले आहे. गेल्या वर्षी नियुक्त झालेले देवस्थान न्यासाचे अध्यक्ष अमर साठे यांच्या पुढाकारामुळे या कामांना गती मिळाली. दुर्मिळ वनस्पतींची लागवड, पर्यटकांना आनंददायी अनुभव देणारे नियोजन आणि परिसराची सौंदर्यवृद्धी यावर विशेष भर देण्यात आला. मंदिराचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. रथ मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या देवीच्या पायांचे ठसे व केस या पवित्र स्थळांभोवती कठडे बांधून नामफलक लावण्यात आले आहेत. लगत असलेले जीर्ण पार दुरुस्त करून त्यांचीही शोभा वाढवण्यात आली आहे. सध्या काही कामे अंतिम टप्प्यात असून, तलावात कारंजे बसवण्यात येत आहेत.
देवस्थान न्यासाने या प्रकल्पासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च केले असून, राज्यशासनाच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. या बदलामुळे केळशीतील धार्मिक पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे २७ नक्षत्रांची झाडे तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार, धार्मिक विधींमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिर परिसर केवळ धार्मिक स्थळ न राहता पर्यावरणपूरक आणि अभ्यासासाठीही उपयुक्त असा बनत आहे.
---
चौकट
धार्मिक पर्यटनाला मिळेल चालना
मंदिर परिसरातील विकासकामांमुळे केळशीची ओळख अधिक उठावदार झाली आहे. पूर्वी काही मूलभूत सुविधांची कमतरता जाणवत होती; मात्र आता स्वच्छता, सुस्थित पाणीव्यवस्था, वाहनतळ आणि आकर्षक बगीचामुळे भाविकांना समाधानकारक अनुभव मिळत आहे. तलावाभोवती तयार केलेला फेरफटका मार्ग आणि बसण्याची व्यवस्था आकर्षण ठरत आहे. सुशोभीकरणामुळे आधीच स्वच्छ व सुंदर असलेला परिसर अधिक देखणा झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक, स्थानिक नागरिक तसेच पर्यटक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे तसेच धार्मिक पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल, असे जीवन सुर्वे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com