मळगावमध्ये आजपासून ‘बलिदान मास’ उपक्रम
मळगावमध्ये आजपासून
‘बलिदान मास’ उपक्रम
सावंतवाडी ः मळगाव येथील शिवशंभू ग्रुपतर्फे १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्तावाडा शाळेच्या पटांगणावर ‘छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’ साजरा करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांमधून तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागृती निर्माण व्हावी व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, हा मुख्य उद्देश आहे. यानिमित्त दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत बलिदान मासचे कार्यक्रम नियमितपणे होणार आहेत. या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाला अभिवादन करण्यात येणार असून, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व शहिदांच्या स्मृतींनाही आदरांजली वाहण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र तसेच राष्ट्रनिष्ठेची भावना जागवणारे संदेश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशंभू ग्रुपने केले आहे.
...................
सावंतवाडीत उद्या
‘शिवजन्मोत्सव’
सावंतवाडी, ता. १७ ः अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्यावतीने गुरुवारी (ता. १९) शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.०० वाजता सावंतवाडी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या मराठा सदस्यांचा सत्कार, सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शूर शिवराया’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. यामध्ये पोवाडा, शाहिरी जलसा आणि शिवरायांच्या इतिहासावर आधारित सादरीकरण होणार आहे. सर्व मराठा बांधवांनी आणि शिवप्रेमींनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी केले आहे.
......................
शिष्यवृत्ती परीक्षेचे
कुडाळात आयोजन
कुडाळ, ता. १७ ः राज्याच्या विविध विभागांतर्गत नुकतीच नोकर भरती जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने स्वामी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विशेष मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेत निवडून आलेल्या पात्र विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या तलाठी भरती, पोलिस भरती, ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद भरती, म्हाडा, वनरक्षक, एसआरपीएफ, राज्यसेवा व गट क परीक्षा या विशेष बॅचेसमध्ये सवलत आणि मोफत परीक्षा मार्गदर्शन दिले जाणार आहे. शंभर प्रश्न व दोनशे गुण असे परीक्षेचे स्वरूप असून सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि मराठी/इंग्रजी व्याकरण असे या विषय असणार आहेत. परीक्षेत प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्केपर्यंत शिष्यवृत्ती, अनुभवी तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या संचालिका शमिका ओटवणेकर यांनी केले आहे. इच्छुकांनी माठेवाडा, नक्षत्र टॉवरच्या मागे, कुडाळ येथे नावनोंदणी करावी.

