‘संस्था मार्गदर्शनासाठी असोसिएशन स्थापणार’
‘संस्था मार्गदर्शनासाठी
असोसिएशन स्थापणार’
बांदा ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्थांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांमध्ये संधी मिळावी, यासाठी जिल्हास्तरीय असोसिएशन स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कोकण संस्थेचे अध्यक्ष, युनिफाईड फेडरेशन महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली. अनेक वेळा जलजीवन मिशन असेल किंवा पोषण व इतर विकास योजनांमध्ये जिल्ह्याबाहेरील संस्थांना प्राधान्य मिळते आणि माहितीअभावी किंवा एकजूट नसल्याने स्थानिक संस्था मागे राहतात. ही स्थिती बदलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन सामूहिक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या असोसिएशनच्या माध्यमातून प्रकल्प लेखन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, निधी उभारणी प्रशिक्षण, तसेच उद्योगसंस्थांच्या सामाजिक दायित्व निधीबाबत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कुबल यांनी केले आहे.
-------
सिंधुदुर्गनगरीत १४ मार्चला
राष्ट्रीय लोक अदालत
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. २०२६ मधील ही पहिली राष्ट्रीय लोक अदालत आहे. सर्व नागरिक, शासकीय विभाग, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या व संबंधित पक्षकारांनी आपल्या तडजोडीयोग्य प्रकरणांचा आढावा घेऊन राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा. आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा. दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांनी केले आहे.
-----
ओटवणे येथे आज
शिवजयंती उत्सव
ओटवणे ः येथील शिवप्रेमींच्यावतीने शिवजयंतीनिमित्त उद्या (ता. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८.३० वाजता श्री रवळनाथ वाचनालय ते श्री रवळनाथ विद्यामंदिरपर्यंत भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत ओवी आरोसकर, सिद्धी राऊळ यांचे साहसी खेळ होणार आहेत. तसेच ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, १० वाजता श्री रवळनाथ विद्यामंदिरच्या २०१२-१३ च्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील छत्रीचे अनावरण, १०.३० वाजता प्रमुख मान्यवरांची भाषणे, रात्री ८ वाजता श्री रवळनाथ विद्यामंदिरच्या पटांगणावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे.
...................
पिंगुळी येथे आज
शिवप्रतिमा पूजन
कुडाळ ः साई कलामंच, सखे सोबती मित्रमंडळ पिंगुळी, सहभागी मंडळ व संस्था यांच्या वतीने उद्या (ता. १९) शिवजयंती निमित्त सकाळी १० वाजता दीपक गावडे यांच्या दुकानाजवळ छत्रपती शिवरायांची प्रतिमापूजन सोहळा आयोजित केला आहे. दुपारी ४.४५ वाजता तेथून आनंदवन संकुल शिवजयंती उत्सव मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत उपस्थित शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या नावाचा अखंड जयघोष करत जाणार आहेत. सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे व छत्रपती शिवरायांच्या जयघोषात आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
मालवणात आज
नेत्र चिकित्सा
आचरा ः शिवजयंतीनिमित्त आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या वतीने शिवसेनेतर्फे आचरा तिठा किल्ला लॉज जवळ उद्या (ता. १९) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शिबिर होणार आहे. लाभार्थी गरजवंतांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे, पंचायत समिती प्रमुख जयप्रकाश परुळेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

