खल्वायन 322 वी मासिक संगीत सभा
खल्वायनची संगीत सभा उत्साहात
शर्वरी नागवेकर-वैद्य यांचे प्रभावी गायन ; रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : स्थानिक ‘खल्वायन’ संस्थेची ३२२वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय येथे उत्साहात झाली. मुंबईच्या प्रसिद्ध गायिका शर्वरी नागवेकर-वैद्य यांच्या माधुर्ययुक्त आणि दमदार गायनाने ही मैफल रसिकश्रोत्यांसाठी संस्मरणीय ठरली.
ही सभा कै. महर्षी गणेश रामचंद्र बेहेरे व कै. रामकृष्ण गणेश बेहेरेबुवा (कुर्धे) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्मृती संगीत मैफल’ म्हणून आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात चिपळूणचे कलारसिक चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. गायिका वैद्य यांनी मैफलीची सुरुवात राग पुरिया धनाश्रीमधील ‘बाली बाली जाऊ’ या पारंपरिक विलंबित एकतालातील बंदिशीने केली. त्यानंतर त्यांनी याच रागातील द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. धारदार स्वरलगाव आणि तार सप्तकातील प्रभावी आलाप-तानांमुळे मैफलीत सुरुवातीपासूनच रंगत आली. पुढील सादरीकरणात त्यांनी राग दुर्गामधील पंडित कुमार गंधर्व रचित मध्यलय रूपक आणि द्रुत तीनतालातील बंदिशी सादर केल्या. तसेच, राग धानीमधील ‘तान धेरेना’ हा तराणा सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. मैफलीच्या उत्तरार्धात त्यांनी ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘खरा तो प्रेमा’ ही नाट्यपदे आणि ‘नामदेव कीर्तन करी’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिरचनांनी कार्यक्रमाची सांगता केली.
या मैफलीला दापोलीचे सोहम जोशी (तबला) आणि चिपळूणचे अमित ओक (हार्मोनियम) यांनी उत्तम साथसंगत केली. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले. श्रीनिवास जोशी यांनी कलाकारांचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

