भक्ती आणि परिवर्तनाचा संदेश देणारे नाटक ः झेंडा रोविला
- rat१९p६.jpg-
26O25607
रत्नागिरी- समर्थ बहुउद्देशीय-जवखेडे- जळगाव या संस्थेने सादर केलेल्या ‘झेंडा रोविला’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
संतविचारांचा जागर करणारे ‘झेंडा रोविला’
समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे सादरीकरण ; भक्तिमार्गाच्या मांडणीला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या सकाळच्या सत्रात ‘झेंडा रोविला’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने ‘समर्थ बहुउद्देशीय-जवखेडे-जळगाव’ या संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणले. एका विरोधी मनोवृत्तीच्या व्यक्तीचे कसे परिवर्तन होते, याची रंजक कथा या नाटकातून मांडण्यात आली असून संतविचार, भक्ती, एकात्मता आणि धार्मिक समन्वय हा या नाटकाचा मुख्य गाभा आहे.
लेखक डॉ. समीर मोने यांनी संत संप्रदायावर भाष्य करणारी ही प्रगल्भ संहिता लिहिली असून, दिग्दर्शक अमोल जाधव यांच्या कल्पक दिग्दर्शनातून हा प्रयोग साकारला आहे. नाटकात अभंग, कीर्तन आणि भक्तिमार्ग यांची अतिशय प्रभावी मांडणी करण्यात आली होती. कलाकारांच्या कसदार अभिनयाला आणि विषयाच्या मांडणीला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. धार्मिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या या नाटकातून परिवर्तनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.
----
‘झेंडा रोविला’ या नाटकाची कथा एका शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर घडते. या मंदिरात श्रीविठ्ठलाची मूर्ती स्थापित करून ‘आबा गुरू’ एका हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात; मात्र, त्यांचा मुलगा ‘शंकर’ हा कट्टर शिवभक्त असल्याने या सप्ताहाला तीव्र विरोध करतो आणि सहभागी होणाऱ्या गावकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. सप्ताहादरम्यान निवृत्तीबुवांचे कीर्तन आणि ‘बाबा’ नावाच्या एका ज्ञानी, संतसदृश व्यक्तीचे आगमन होते. बाबा सगुण-निर्गुण भक्ती, अभ्यासाचे महत्त्व आणि संतपरंपरेवर प्रकाश टाकतात. ते संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गोरा कुंभार आणि संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील प्रसंगातून भक्तीचा खरा अर्थ समजावून सांगतात. ‘शैव आणि वैष्णव’ हा भेद मानवनिर्मित असून ईश्वर एकच आहे, हा बोध मिळाल्यावर शंकरच्या मनातील संभ्रम दूर होतो आणि त्याचे अंतर्मन परिवर्तन पावते. सप्ताहाच्या सांगतेवेळी ‘बाबा’ अचानक अदृश्य होतात आणि ज्या ठिकाणी ते बसले होते तिथे केवळ एक भगवा झेंडा उरतो. शेवटी, बाबांनी दिलेला भागवत धर्माचा वारसा पुढे नेण्यासाठी शंकर स्वतः तो भगवा झेंडा उंचावर लावतो जे त्याच्या वैचारिक बदलाचे प्रतीक ठरते.
या नाटकाचा मुख्य गाभा ‘सगुण आणि निर्गुण’ तत्त्वज्ञानावर आधारित आहे. देव एकच असून शैव-वैष्णव असा भेदभाव व्यर्थ आहे, हा मूलभूत संदेश यात प्रभावीपणे मांडला आहे. संतपरंपरेचे महत्त्व, अभंग, कीर्तन आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य माणूस साधना आणि अभ्यासाने कसा महान होऊ शकतो, याची शिकवण हे नाटक देते. धार्मिक एकता, सहिष्णुता आणि भागवत धर्माचा प्रसार हा या नाटकाचा केंद्रबिंदू असून, वर्तमानकाळातील समाजाला संतांच्या विचारांची दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न यात दिसतो. नाटकाच्या शेवटी फडकणारा ‘भगवा झेंडा’ हा केवळ कापड नसून तो श्रद्धा, भक्ती आणि महान धर्मपरंपरा पुढे नेण्याचे जिवंत प्रतीक आहे.
-------
* सूत्रधार आणि सहाय्य
नेपथ्य ः विशाल जाधव, रंगभूषा ः उदयराज तांगडी, संगीत ः बुद्धभूषण मोरे, कोमल पाटील, कुशराज पवार, देवांग शिंपी, प्रकाशयोजना ः शाम चव्हाण, वेशभूषा ः रोहिणी निकुम, नृत्य दिग्दर्शन - प्रतीश पाटील, विशेष सहकार्य ः सुनील कदम, प्रशांत साखळकर, किशोरकुमार साठे.
---------
* पात्र परिचय
बाबा ः राहूल निकम, निवृत्ती ःविशाल जाधव, सगुणा ः पुनम जावरे, शंकर ः भावेश पाटील, आबा गुरव ः भीमराव सपकाळे, सदाशिव ः दीपक कोळी, संत ज्ञानेश्वर ः यतीन पाटील, संत तुकाराम ः प्रितीश पाटील, संत जनाबाई ः प्रणिता शिंपी, संत कान्होपात्रा आणि बालकलाकार ः पूर्वा जाधव, मुद्दालभट ः नितीन सोना, संत नामदेव व संत एकनाथ ः सागर सदावर्ते, गणप्या व गावडा ः अंकुश काकडे, सासू ः पल्लवी पाटील, संत गोरोबा कुंभार ः रवींद्र चौधरी, गावकरी ः सारिका शिंपी, यशवंत शिंपी, हर्षदा चौधरी, मयूर भंगाळे, बालकलाकार ः समर्थ जाधव, राशी ससाणे, हिरण्य ससाणे, योगेश्वरी सैंदाणे, यश सोनार.
----------
* आजचे नाटक
नाटक ः निब्बाण, सादरकर्ते ः सविता नाट्यनिर्मित कलामंच, वेळ ः सकाळी ११.३० वा. नाटक ः ब्रेकपॉईंट, सादरकर्ते ः सेजल इंटरटेनमेंट वेळ ः सायंकाळी ७.३० वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

