''बालस्वास्थ्य''मुळे तान्हुल्याला नवसंजीवनी

''बालस्वास्थ्य''मुळे तान्हुल्याला नवसंजीवनी

Published on

swt1913.jpg
25663
सरंबळ ः येथील दोन महिन्यांच्या ऋत्विक जाधव या तान्हुल्याला आरोग्य विभागाच्या तत्परतेने  हृदय संजीवनी मिळाली.

‘बालस्वास्थ्य’मुळे तान्हुल्याला नवसंजीवनी
मुंबईत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः सरंबळ येथील दोन महिन्यांच्या तान्हुल्यावर शासकीय योजनेतून मोफत ह्रदय शस्त्रक्रिया करून येथील आरोग्य यंत्रणेने त्याला नवे जीवन दिले. आजाराचे निदान झाल्यानंतर तत्परतेने हालचाली करत या बाळावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके यांनी ही माहिती दिली.
सरंबळ येथील मनोहर जाधव व सौ. मयुरी यांचा मुलगा ऋत्विक याला जन्मतः हृदयामध्ये छिद्र असल्याचे निदान झाले. त्याला श्वास घ्यायला अडथळा येऊ लागला. यामुळे पालकांची धावपळ सुरू झाली. त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. मुक्ता दुधगावकर, डॉ. श्रेयस परब तसेच परिचारिका विनया नार्वेकर आणि औषध निर्माता विवेक आंगणे मदतीला धाऊन आले. तत्परतेने बालकाचा ''टूडी ईको रिपोर्ट'' डॉ. प्रशांत बोभाटे यांच्या मदतीने समजून घेऊन तातडीची ऑपरेशनची गरज आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी पालकांना धीर दिला. पुढील शस्त्रक्रिया व उपचारांची पध्दत सांगत या योजनेतून शासनामार्फत मोफत उपचार होणार असल्याचे त्यांना सांगितले.
दिलेल्या सल्ल्याप्रमाणे बाळाच्या पालकांनीही मेहनत घेतली. शासकीय योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ऋत्विकचे मामा नितीन जाधव यांच्यामार्फत त्वरित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी तातडीने मुलाच्या ऑपरेशनसाठी येणाऱ्या खर्चाबाबतच्या मंजुरीचे पत्र दिले. त्याप्रमाणे संघटित होऊन आरोग्य विभागाने तत्परता दाखविली. जिल्हा पातळीवर कागदपत्रांचा पाठपुरावा जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांनी करून दिला. यातून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाचे डॉ. बोभाटे यांनी या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता पालक बाळाला घेऊन आपल्या घरी सरंबळला आले आहेत.

चौकट
बालकांच्या उपचारासाठी योजना ठरली आधार
कुडाळ तालुक्यामधील नवजात बालकापासून ते १८ वर्षे वयापर्यंत बालकास आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवल्यास येथील ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाशी संपर्क साधावा. तालुक्यातील दोन पथकांनी २०२४-२५ या वर्षात ९५ शस्त्रक्रिया केल्या असून ७ हृदयरोग शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे. अनेक बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत मदत पोहोचविली आहे. महिला बाल रुग्णालय कुडाळ व ग्रामीण रुग्णालय यांच्या प्रयत्नाने या बालकांना उपचार देण्यात मोठे यश आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com