अखेर सिंधुदुर्गातील ऊसतोडणी पूर्ण

अखेर सिंधुदुर्गातील ऊसतोडणी पूर्ण

Published on

wt1914.jpg
25681
वैभववाडी ः लांबलेल्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला.

सिंधुदुर्गात ऊस उत्पादनात घट
९०० हेक्टरमधून केवळ ३५ हजार टन; अखेर जिल्ह्यातील ऊसतोडणी पूर्ण
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः जिल्ह्यातील ऊसतोडणी अखेर बुधवारी (ता. १८) पूर्ण झाली. ९०० हेक्टर क्षेत्रातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन उत्पादनच झाले आहे. अतिृवष्टी आणि ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे ऊस उत्पादन घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिंधुदुर्गातील ऊस लागवड क्षेत्रात वर्षागणीक घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी ११६० हेक्टरवर ऊस लागवड क्षेत्राची नोंद होती, परंतु जिल्ह्यात यावर्षी ९०० हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊसाच्या क्षेत्रात २६० हेक्टरने घट झाली. जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. याशिवाय मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत काही प्रमाणात ऊसशेती आहे. जिल्ह्यातील अधिकतर ऊस डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपाकरिता जातो, तर काही राधानगरी येथेही नेला जातो. जिल्ह्यात यावर्षी ८ मे पासून पावसाला सुरुवात झाली. मे महिन्यातील पाऊस काही अंशी ऊसाला किफायतशीर ठरला, परंतु त्यानंतर सतत मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवस ऊसशेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. ८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. पावसामुळे जमिनीत ओलावा डिसेंबरपर्यंत राहिला. ऊस गाळप हंगाम सुरू झाला, परंतु जिल्ह्यातील अनेक ऊसशेतीपर्यंत जाताना ट्रक रुतण्याची शक्यता असल्याने ऊसतोडणी विलंबाने सुरू झाली.
यावर्षी जानेवारीमध्ये ऊसतोडणी सुरू झाली. सुरुवातीला अतिशय धीम्यागतीने ऊसतोडणी सुरू होती. अवघ्या पाच-सहा यंत्रणा कार्यान्वित होत्या. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यात ३० ते ४० तोडणी यंत्रणा कार्यरत झाली. त्यामुळे यावर्षी १८ फेब्रुवारीलाच ऊसतोडणी पूर्ण झाली. ऊसतोडणी पूर्ण झाल्यानतंर ऊस उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ९०० हेक्टरवरील ऊसतोडणी पूर्ण झाली असून यातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन म्हणजेच एकरी १५.२ टन ऊस उत्पादन आले आहे, तर गेल्यावर्षी हेक्टरी ४५ टन उत्पादन होते. ऊस लागवडीसाठी करावी लागणारी नांगरणी, बियाणे, खते, भरणी याकरिता मोठा खर्च येतो. त्या तुलनेत एकरी येणाऱ्या अल्प उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला आहे.
यावर्षी सतत झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस याचा मोठा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे.
................
चौकट
ऊस लागवडीतील घट चिंताजनक
जिल्ह्यात बाळसे धरू पाहत असलेल्या ऊसशेतीचे क्षेत्र वर्षागणीक कमी होत गेले. १७०० हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र पोहोचले होते आणि १ लाख ५ हजार टनापर्यंत ऊस उत्पादन होते, परंतु आता ऊस लागवडीखालील क्षेत्र ९०० हेक्टर तर ऊस उत्पादन ३५ हजार टन इतके झाले आहे. ऊस लागवड क्षेत्रातील होत असलेली घट जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
..................
कोट
पावसाळ्यात सतत पाऊस झाला. त्यामुळे ऊसासाठी आवश्यक वातावरण निर्मिती झालीच नाही. त्याचा विपरित परिणाम उत्पादनावर झाला आहे. ऊस उत्पादन त्यामुळेच कमी झाले आहे.
- डॉ. विजय शेट्ये, प्रमुख, ऊस संशोधन केंद्र, नापणे (ता. वैभववाडी)
.......
कोट
वेगवेगळ्या कारणांनी ऊस उत्पादक गेल्या तीन-चार वर्षांपासून अडचणीत येत आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांना तोडणीच्या समस्येने ग्रासले होते, परंतु यावर्षी नैसर्गिक आपत्ती ओढवली. सततच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा एकंदरीत परिणाम ऊसाच्या वाढीवर झाला आणि त्यामुळेच उत्पादन घटले.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com