

-rat१९p९.jpg-
२६O२५६१०
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत समर्थ रंगभूमी-रत्नागिरी या संस्थेने सादर केलेल्या अग्निपंख या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------
समाजव्यवस्थेवर भाष्य करणारे अग्निपंख
समर्थ रंगभूमीचा सर्वांगसुंदर प्रयोग; अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्याला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः स्वातंत्र्योत्तर काळातील कोकणातील समाजव्यवस्था, गरीब-सावकार भेद, जातीयता, समाजातील तणाव यांचे तीव्र आणि जिवंत प्रतिबिंब लेखक प्र. ल. मयेकर यांनी अग्नीपंख या संहितेतून मांडले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कुटुंबव्यवस्था एकटीने सांभाळणारी सक्षम स्त्री, तिच्यावर येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि पत्नी-आई-सून म्हणून तिची भूमिका हरवत जाण्याची वेदना हे सर्व अत्यंत प्रभावीपणे दिग्दर्शक ओमकार पाटील यांनी मांडले आहे. राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीत समर्थ रंगभूमी या संस्थेने हा प्रयोग सादर केला. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत अशा चारही बाजूने नाटक सर्वांगसुंदर झाले. या वेळीही हाऊसफुल झालेल्या या नाटकाचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
----
‘अग्निपंख’ हे नाटक १९४८ मधील महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशात निर्माण झालेल्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेवर भाष्य करते. कोकणातील एका जमीनदार घराण्यात घडणाऱ्या या कथेचे केंद्रस्थान ‘दुर्गा’ (बाईसाहेब) या आहेत. बाईसाहेब या एक दृढनिश्चयी आणि मातृसत्ताक प्रवृत्तीच्या स्त्री असून, आपल्या शिस्तीच्या जोरावर त्या घर आणि जमीनदारीची धुरा समर्थपणे सांभाळत असतात. त्यांचे पती रावसाहेब हे त्यांच्या शिष्टाईपुढे हतबल होऊन मद्याचा आधार घेतात, तर त्यांची मुले इंदू आणि राजशेखर मुंबईत शिक्षणासाठी असतात.
नाटकाला वळण मिळते जेव्हा या मुलांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या बाईसाहेबांच्या कानावर येतात. इंदूचे प्रेम वाड्यातील कामगार रघूच्या नातवावर (यशवंत) असते, तर राजशेखरचे प्रेम दुसऱ्या जातीतील सुनीता नावाच्या मुलीवर असते. परजातीतील सून आणि कामगार वर्गातील जावई या गोष्टी बाईसाहेबांच्या तत्त्वात बसणाऱ्या नसतात. त्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र यशवंत आणि कामगार नेता सुभानराव यांच्या नेतृत्वाखाली कामगार एकजूट होऊन पगारवाढीसाठी बाईसाहेबांविरूद्ध दंड थोपटतात. या संघर्षात अखेर बाईसाहेब आपली कंपनी बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतात.
गांधीजींच्या हत्येनंतर देशभरात तणाव निर्माण होतो. हत्येनंतर पुण्यात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी जातीय दंगली उसळतात. याचा फटका बाईसाहेबांच्या साम्राज्यालाही बसतो. त्यांची कंपनी जाळली जाते आणि घरापर्यंत आगीचे लोळ पोहोचतात. बदलत्या काळापुढे आणि वाढत्या हिंसेपुढे हतबल झालेल्या बाईसाहेब अखेर घराण्याच्या सर्व चाव्या आपली सून सुनीता हिच्या स्वाधीन करतात आणि कुटुंबाला सुरक्षिततेसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला देतात. नाटकाच्या शेवटी, पेटलेल्या वाड्यात हताश बसलेल्या दुर्गाबाईंना रावसाहेब बाहेर काढतात, जो प्रसंग अत्यंत भावुक आहे. जुन्या काळाचा प्रत्यय देणारे नेपथ्य, सहज आणि सुंदर प्रकाशयोजना तसेच प्रसंगांना पूरक असे पार्श्वसंगीत यामुळे ‘अग्निपंख’ हे नाटक सर्वार्थाने दर्जेदार झाले आहे.
--------------
सूत्रधार आणि साहाय
लेखक ः प्र. ल. मयेकर, दिग्दर्शक ः ओंकार पाटील, पार्श्वसंगीत ः ओंकार बंडबे, अमेय किल्लेकर. प्रकाशयोजना ः कुलभूषण देसाई, रंगभूषा ः उदयराज तांगडी, वेशभूषा ः चैताली पाटील आणि आर्या जोगळेकर-केतकर.
---------
पात्र परिचय
बाईसाहेब ः ऋचा भुते, रावसाहेब ः मिनार पाटील, इंदू ः चैताली लिमये, राजशेखर ः सुशांत केतकर, सुनीता ः साक्षी बने, गोखले ः संतोष गार्डी, रघू ः सुशील जाधव. यशवंत ः कौशल मोहिते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.