रत्नागिरी ः सेवानिवृत्तीनंतरचा जीवन प्रवास ''कर्नल सरंजामे आणि ती''

रत्नागिरी ः सेवानिवृत्तीनंतरचा जीवन प्रवास ''कर्नल सरंजामे आणि ती''

Published on

rat20p8.jpg-
25885
रत्नागिरी-सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘कर्नल सरंजामे आणि ती’ या नाटकातील एक क्षण.

राज्य नाट्यस्पर्धा - लोगो

सेवानिवृत्तीनंतरचा जीवनप्रवास ‘कर्नल सरंजामे आणि ती’
सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूरचे सादरिकरण; अभिनयाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०: पैसा आणि मालमत्तेचा मोह माणसाला कोणत्या थराला नेऊन ठेवतो आणि त्यातून मानवी स्वभावाची एक वेगळीच प्रवृत्ती कशी आकाराला येते, याचे प्रभावी चित्रण ‘कर्नल सरंजामे आणि ती...’ या नाटकातून करण्यात आले. लेखक सुनील देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संजय रामटेके यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत ‘सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर’ या संस्थेने स्थानिक स्वा. सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर केला. निवृत्त कर्नल सरंजामे यांचा जीवनप्रवास आणि त्यांची अफाट संपत्ती मिळवण्यासाठी इतरांकडून केली जाणारी खटपट, हे या नाटकाचे मुख्य सूत्र आहे. विशेषतः कर्नल आणि लीना यांच्या भूमिकेतील कलाकारांच्या कसदार अभिनयाचे कौतुक झाले.

काय आहे नाटक ?
निवृत्त कर्नल सरंजामे आपल्या आलिशान बंगल्यात एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मनात सतत जुन्या आठवणींचे काहूर असते. महाविद्यालयीन जीवनात मालती नावाच्या तरुणीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते; मात्र देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याच्या निर्णयामुळे मालती आणि कर्नल यांची ताटातूट झाली. कर्नलने त्यानंतर कधीही लग्न केले नाही; पण उतारवयात त्यांना मालतीच्या प्रेमाची ओढ तीव्रतेने जाणवू लागते.
एके दिवशी कर्नलचा सहकारी ''सतेंद्र'' यांचा मुलगा इन्स्पेक्टर दीपेंद्र कर्नलना भेटायला येतो. तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचे गूढ विचारतो तेव्हा कर्नल एका थरारक घटनेचा उलगडा करतात. लडाखमध्ये असताना काही मुले एका मुलीची छेड काढत होती. तिला वाचवण्यासाठी सतेंद्रने गोळी झाडली, ज्यात एका मुलाचा मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी सतेंद्रला बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवले. या घटनेनंतर कोर्टमार्शल होऊन सतेंद्रला १० वर्षांची शिक्षा झाली आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली; मात्र, कर्नलसाठी ती आत्महत्या नसून एक ''खून'' होता, ज्याचा बदला घेण्याची जिद्द ते आजही बाळगून आहेत.
एकटेपण घालवण्यासाठी दीपेंद्रच्या सल्ल्यानुसार, कर्नल आपल्या बंगल्यात लीना नावाच्या तरुणीला पेईंग गेस्ट म्हणून ठेवतात. शेजारी राहणारी मेरी (जी एक नर्स आहे) कर्नलची देखभाल करत असते. कर्नलचे तिच्यावर सुप्त प्रेम असते; पण ते कधीही व्यक्त होत नाही. दुसरीकडे, लीना कर्नलची पोटच्या मुलीप्रमाणे सेवा करते; पण त्यामागे कर्नलची गडगंज संपत्ती मिळवण्याचा तिचा स्वार्थ असतो.
जेव्हा लीना कर्नलना त्यांच्या शेवटची इच्छा विचारते तेव्हा कर्नल सांगतात, "मला शिमला-मनाली फिरायचे आहे, मेरीचा एक मुका घ्यायचा आहे आणि मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अजून २५ वर्षे जगायचे आहे. हे ऐकून संपत्तीची हाव असलेली लीना हताश होते.
लीनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत मद्यधुंद तरुण तिची छेड काढतात. कर्नल तिला वाचवण्यासाठी बाहेर येतात आणि स्वसंरक्षणार्थ गोळीबार करतात, ज्यात एकाचा मृत्यू होतो. या धक्क्याने कर्नलना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. मेरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते; पण कर्नल प्राण सोडतात. शेवटी तपासादरम्यान दीपेंद्रच्या हाती कर्नलचा एक लखोटा लागतो. त्यात लिहलेले असते की, "लीना ही माझी जुनी प्रेमिका ''मालती''चीच मुलगी आहे आणि मी माझी सर्व संपत्ती तिच्याच नावे केली आहे." हे वाचताच लीना कोसळते. ज्या संपत्तीसाठी तिने इतका खटाटोप केला ती तिला प्रेमापोटी आधीच मिळणार होती, या विचाराने ती हंबरडा फोडते.

* सूत्रधार आणि सहाय्य
नेपथ्य ः संकेत पगारे, प्रकाशयोजना ः शिवशंकर माळोदे, संगीत योजना ः आलेख कोटरंगे, रंगभूषा ः श्रीहरी दुर्गे, वेशभूषा ः रत्नाकर जैन, सहकारी तंत्रज्ञ ः विष्णू पगारे, इरफान शेख, स्वाती चौधरी.

* पात्र परिचय
कर्नल ः डॉ. प्रजेश घडसे, मालती व लीना ः सुमेधा श्रीरामे, दीपेंद्र ः गौरव पराते, मेरी ः प्रणिता चव्हाण, बळवंत ः योगेश भलमे, गँग ः आदर्श मास्टे, सॅम ः दीपरत्न मडावी, रूची ः सलोनी डाखरे, सॅक ः साक्षी गुरनुले, दिनू ः संजय रामटेके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com