आंबडपाल शाळेला ‘अ प्लस’ श्रेणी
25916
आंबडपाल शाळेला ‘अ प्लस’ श्रेणी
गुणवत्ता मूल्यांकन; बाह्य मूल्यमापनात दर्जा सिद्ध, जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यमापनात तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबडपालने उत्कृष्ट कामगिरी करत ‘अ+’ श्रेणी प्राप्त केली. या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून शाळेचे कौतुक होत आहे.
शासनाच्या वतीने शाळांचा शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये शाळेने राबवलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग या जोरावर शाळेने हे मानांकन मिळवले आहे. राज्यातील मोजक्याच शाळांना हा बहुमान मिळाला असून, त्यात आंबडपाल शाळेने आपले स्थान निश्चित केले आहे. याचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक संजय बगळे, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि पालकांना देण्यात आले. शाळेच्या या यशाबद्दल परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा विश्वास शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अवांतर उपक्रमांतही आपली मोहोर उमटवली आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलवलेली ‘केळीची बाग’ हे श्रमसंस्काराचे उत्तम उदाहरण ठरत आहे. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ आणि ‘गुणवत्तापूर्ण शाळा’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता ती शाळेची विशेष ओळख बनली आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक बगळे यांनी केले.
.....................
खासगी शाळांच्या तोडीस तोड दर्जा
मूल्यमापनाच्या प्रक्रियेत शाळेचे भौतिक वातावरण, मुलांची शैक्षणिक प्रगती आणि शाळा व्यवस्थापनाचा सक्रिय सहभाग या सर्व निकषांवर शाळा सरस ठरली आहे. हे यश मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. शाळेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्हा परिषद शाळा देखील खासगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण देऊ शकतात, हे आंबडपाल शाळेने सिद्ध केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

