तिडे धरणामुळे शेती सुजलाम सुफलाम
rat20p15.jpg-
O25942
तिडे : नानू खैरे व केवल खैरे या बंधूनी उन्हाळी केलेली भातशेती.
rat20p16.jpg-
25943
तिडे धरण
---------
तिडे धरणामुळे शेती सुजलाम सुफलाम
लघु आकाराचे मातीचे धरण; मंडणगडमधील शेतीला नवे बळ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० ः मंडणगड तालुक्याच्या सिंचनक्षमतेत मोठी भर घालणारे तिडे गावातील लघु आकाराचे माती धरण अखेर पूर्णत्वास आले असून, तालुक्यात पूर्ण झालेल्या धरणांमध्ये याचा पहिला क्रमांक लागला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीविकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
२००९ मध्ये सुरू झालेल्या या धरणाचे काम कोणत्याही मोठ्या अडचणींशिवाय पूर्ण झाले. दरवर्षी धरणात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होत असून, धरणाची एकूण साठवण क्षमता ७.५०७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तिडे, तळेघर, टाकडे, वलौते, पिंपळोली आणि पालघर या गावांचा या धरणाच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाइपलाइनद्वारे सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे तिडे परिसरातील शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात कलिंगड, जनावरांचा चारा तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड करणे शक्य झाले आहे. पूर्वी पावसावर अवलंबून असलेली शेती आता हळूहळू सिंचनाखाली येत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
आणखी पाच धरणांचे कामे अपूर्ण
मंडणगड तालुक्यातील तुळशी, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि वेळास येथील धरणांची कामे तीन दशकांपूर्वी सुरू झाली असली तरी तांत्रिक अडचणी व रखडलेल्या कामांमुळे ती अद्याप अपूर्ण आहेत. २०१९ मधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर धरण सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पंदेरी धरणाला तडे गेल्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती व सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
चौकट
पडीक जमीन सिंचनाखाली येणे आवश्यक
तुळशी, भोळवली आणि चिंचाळी धरणांमध्ये पूर्वी गळती व तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या; मात्र त्या वेळी झालेल्या दुर्लक्षामुळे धरणांच्या मजबुतीचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा पार्श्वभूमीवर तिडे धरणाचे यशस्वी पूर्णत्व हे तालुक्यासाठी दिलासादायक ठरले आहे. या धरणामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून, शेतकऱ्यांनी पडीक जमीन सिंचनाखाली आणून पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. दुबार शेतीचे प्रयोग या भागात यशस्वी होत असून, भविष्यात तिडे धरणाचे पाणी मंडणगडच्या कृषी विकासाचा प्रमुख आधार ठरणार आहे.
कोट
तिडे धरण पूर्ण झाल्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पावसावरच शेती अवलंबून असल्याने वर्षातून एकच पीक घ्यावे लागत होते. मात्र आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात भाजीपाला, कलिंगड तसेच जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करणे शक्य झाले आहे. धरणातून थेट शेतापर्यंत पाणी पोहोचत असल्याने शेती करणे सोपे झाले असून उत्पादन वाढण्याची आशा आहे. शेतकऱ्यांनीही पाण्याचा योग्य व जपून वापर करून दुबार शेतीकडे वळणे गरजेचे आहे. तिडे धरणामुळे मंडणगड तालुक्यातील शेतीला निश्चितच नवी उभारी मिळेल, असा विश्वास आहे.
- दयानंद येसरे, शेतकरी, तिडे
कोट
तिडे धरणामुळे उन्हाळ्यातही शेती करणे शक्य झाले असून, आम्ही यंदा प्रथमच उन्हाळी भातशेतीचा प्रयोग केला आहे. पूर्वी पाण्याअभावी जमीन पडीक ठेवावी लागत होती; मात्र आता सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने वर्षभर शेती करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. धरणाचे पाणी वेळेवर मिळाल्यामुळे भातपिकाची वाढ चांगली होत असून, उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते. शासनाने उभारलेल्या या धरणाचा योग्य वापर करून परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी उन्हाळी व दुबार शेतीकडे वळावे, असे आम्हाला वाटते.
- नानू खैरे व केवल खैरे, ग्रामस्थ, तिडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

