रत्नागिरी- मालगुंड येथे स्कुबा डायव्हिंग प्रकल्प

रत्नागिरी- मालगुंड येथे स्कुबा डायव्हिंग प्रकल्प

Published on

-rat20p14.JPG-
O25941
रत्नागिरी ः मालगुंड किनारा
-------------

मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प
लवकरच प्राथमिक सर्व्हे ; कोरल्स, रंगीबेरंगी मासे असल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : मालवणच्या धर्तीवर मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. मालगुंड किनाऱ्यापासून काही अंतरावर कोरल्स असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग सुरू झाले तर पर्यटनाला चालना मिळणार आहे तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लब करण्यात येणार आहे.
कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळत आहे. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. गणपतीपुळेसह आजुबाजूच्या परिसरातही पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. बहुसंख्य पर्यटक एक दिवसाचे पर्यटन म्हणून गणपतीपुळेकडे पाहतात. हा पर्यटक स्थिर राहावा या दृष्टीने शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे बोट क्लब आणि मालगुंड येथे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुसार हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एमटीडीसीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, या भागाचा तांत्रिक सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मालवणमधील तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचे यश लक्षात घेऊनच मालगुंड येथे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. येथील किनाऱ्यापासून काही अंतरावर विशिष्ट प्रकारच्या कोरल्स आढळलेल्या आहेत. तसेच रंगीबेरंगी मासेही पाहायला मिळालेले आहेत. हा किनारा शांत असल्यामुळे सुरक्षित आहे. येत्या काही दिवसात या ठिकाणी एमटीडीसीकडून विस्तृत सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी स्कुबा डायव्हर्सचे पथक या ठिकाणी दाखल होणार आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित झाला तर पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. मालगुंड हे कवी केशवसुतांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव पुस्तकांचे गाव म्हणूनही विकसित करण्याच्या हालचाली सुरू आहेत तसेच स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे झाले तर परदेशी पर्यटकही या भागाकडे आकर्षित होतील. हे सर्व लक्षात घेऊन एमटीडीसीने हा प्रकल्प सुरू करण्याबाबत पावले उचलली आहेत.
दरम्यान, सर्व्हे करताना समुद्राखालची जैवविविधता तपासली जाणार आहे. या समुद्रात रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ यांचा अभ्यास करण्यात येईल. तसेच स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याची पारदर्शकता महत्त्वाची असल्यामुळे वर्षातील किती महिने येथे डायव्हिंग करता येईल, याचे मोजमाप केले जाईल. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्राचा प्रवाह आणि खोली यांचा तांत्रिक अहवाल बनवण्यात येणार आहे.

कोट
स्कुबा डायव्हिंग प्रकल्पामुळे मालगुंड येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी स्कुबा डायव्हर्सचे पथक बोलवण्यात येणार आहे. याचा फायदा स्थानिकांना रोजगाराला होईल.
- दीपक माने, प्रादेशिक व्यवस्थापक कोकण विभाग, एमटीडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com