चिपळूण-समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण
काव्यलेखन स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण
‘आपलं चिपळूण’ संस्थेचा पुढाकार ; अतुल देशपांडेंना प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अभिनव स्वरूपाच्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थच्या राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उद्या (ता. २१) होत आहे. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात होईल. या स्पर्धेत नाशिकच्या अतुल देशपांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
‘आपलं चिपळूण’ संस्था या स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याची सहआयोजक आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कन्साई नेरोलॅक पेन्टसचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ नगसेवक शशिकांत मोदी आदी उपस्थित राहणार आहेत. चिपळूण शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शनिवारी दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर बांधावरच्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांचा साहित्यिक प्रवास उलगडणारी मुलाखत होईल. ही मुलाखत विनायक ओक आणि विलास महाडिक घेतील.
दुपारच्या सत्रात राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेते कवी आणि निमंत्रिक कवींचे कवीसंमेलन होणार आहे. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन राष्ट्रपाल सावंत करतील. या वेळी ‘लोटिस्मा’चा प्रतिष्ठेचा श्रीकांत गोवंडे बालवाड्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे चिपळूण अध्यक्ष अरूण इंगवले यांनी केले आहे.
चौकट
विजेत्यांचा सन्मान
या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात अतुल देशपांडे (प्रथम, नाशिक), किरण वेताळ (द्वितीय, पुणे), डॉ. मनोज वराडे (तृतीय, मुंबई), विजय सातपुते (पुणे), विजया गुळवणी (पुणे), वृंदा कुलकर्णी (पालघर), सुधीर नागले (रायगड), हर्षदा सुंठणकर (बेळगाव, सर्व उत्तेजनार्थ), सुजाता संजय (लंडन), डेविड पेनकर (इस्रायल), शर्मिला पटवर्धन (बंगलोर), सुषमा वडाळकर (बडोदे), कविता पुणतांबेकर ‘कुमुद’ (इंदौर), सारिका बिवलकर (रत्नागिरी), मेधा लोवलेकर (चिपळूण, सर्व प्रोत्साहनपर) आदींना गौरवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

