रत्नागिरी- १ मे रोजी उद्घाटन , काम कसे पूर्ण करायचे ते बघा
-rat20p26.jpg
26068
रत्नागिरी ः रत्नागिरी नगरपालिका इमारतीची पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत.
१ मे रोजी उद्घाटन, काम कसे पूर्ण करायचे ते बघा
पालकमंत्री सामंतांनी ठेकेदाराला सुनावले; पालिका इमारतीची पाहणी
रत्नागिरी, ता. २० : रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतींची कामे रखडल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ठेकेदार कंपनीची चांगलीच कानउघाडणी केली. १ मे, महाराष्ट्र दिन ही उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे, त्यापूर्वी काम पूर्ण करा. त्यासाठी कोणालाही मदतीला घ्यायचे ते घ्या; पण वेळेत काम हवेच, अशा कडक शब्दांत त्यांनी ठेकेदारांना खडसावले.
पालकमंत्री उदय सामंत गेले दोन दिवस रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शहर आणि परिसरातील विकासकामांचा ते आढावा घेत आहेत. रत्नागिरी पालिकेची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येत आहे; परंतु या इमारतीचे काम अजून अपूर्ण आहे. काम रखडल्यामुळे या कामाचीही आज दुपारी मंत्री सामंत यांनी पाहणी केली. यावेळी ठेकेदार कंपनीला त्यांनी चांगलेच सुनावले. सुमारे पंधरा कोटींच्यावर खर्च करून ही इमारत बांधली जात आहे; परंतु अजून अंतर्गत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पाहणीदरम्यान पालकमंत्री चांगलेच संतापले. १ मे रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्याची तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम कसे पूर्ण करायचे, तो तुमचा प्रश्न आहे. न्याती कंपनीला सोबत घ्या आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत.
तत्पूर्वी गुरुवारी (ता. १९) रात्री पेठकिल्ला येथील शिवसृष्टीची पाहणी केली. शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीला सांगितले आहे. या शिवसृष्टीमुळे पर्यटनाला शहर पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिक आकर्षित होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
-----
चौकट
टर्मिनल बिल्डिंग अंतिम टप्प्यात
विमानतळाच्या धावपट्टीसह टर्मिनल बिल्डिंगचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. त्याचीही पालकमंत्री सामंत यांनी पाहणी केली. टर्मिनल बिल्डिंगचे कामदेखील शेवटच्या टप्प्यात आले आहे. तारांगणाचीदेखील सामंत यांनी पाहणी केली. कोट्यवधी रुपये खर्च करून ही विकासकामे केली आहेत ती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

