विलवडेत कालव्याचे पाणी रस्त्यावर

विलवडेत कालव्याचे पाणी रस्त्यावर

Published on

26118

विलवडेत कालव्याचे पाणी रस्त्यावर

गळतीमुळे प्रकार; रब्बी हंगाम अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१: परिसरातील तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याला सुमारे दहा दिवसांपूर्वी पाणी सोडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध झाल्याने भातशेतीनंतर भाजीपाला व इतर उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, हे समाधान अल्पकाळ टिकले असून आता कालव्याच्या ठिकठिकाणी होणाऱ्या पाणी गळतीमुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे.
कालव्याच्या भिंतींना ठिकठिकाणी पडलेले तडे आणि झिरपणाऱ्या पाण्यामुळे शेतजमिनींमध्ये अनावश्यक पाणी साचू लागले आहे. काही ठिकाणी पाणी इतक्या प्रमाणात बाहेर पडत आहे, की ते थेट मुख्य रस्त्यावर येत असून वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे. विशेषतः बांदा-दाणोली मार्गावर विलवडे तिठ्याच्या खाली कालव्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. रस्त्यावर सतत पाणी साचल्याने डांबरीकरण खराब होत असून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
स्थानिक वाहनधारकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निसरडा रस्ता, चिखल आणि पाण्याचे प्रवाह यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहनांनाही सावधगिरीने जावे लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
शेतकरी वर्गाकडूनही मिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एका बाजूला पाणी उपलब्ध झाल्याने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे. काही शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिकांची मुळे कुजण्याची भीती आहे. तसेच कालव्याच्या तटबंदीची मजबुती कमी झाल्यास भविष्यात मोठ्या भगदाडाची शक्यता नाकारता येत नाही, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
कालव्यात पाणी पूर्ण क्षमतेने सोडल्याने ठिकठिकाणी कालव्याला गळती लागली आहे. बांदा शहरातही कालव्यालगतचे नाले व छोटे ओहोळ पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिकांच्या घरातही कालव्याचे पाणी शिरले होते.
-----------
डागडुजी न केल्याचा आरोप
‘‘पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची योग्य दुरुस्ती आणि डागडुजी केलीली नाही केवळ पाणीपुरवठा सुरू करण्यावर भर दिला. मात्र, गळतीच्या ठिकाणी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तिलारी पाटबंधारे विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून गळती बंद करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा शेतीला दिलासा देणारे हेच पाणी सार्वजनिक रस्त्यांसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते,’’ अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
-----------
कोट
तिलारी उपकालव्याची दरवर्षी दुरुस्ती करण्यात येते. मात्र, गळतीचे प्रमाण हे सुरूच आहे. दरवर्षी केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी ही कामे केली जातात. प्रत्यक्षात कार्यवाही नसल्याने गळतीचे प्रमाण हे वाढतेच आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधू.
- रियाज खान, युवासेना तालुकाप्रमुख, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com