सावंतवाडीत रंगभूमीचा सोहळा, रसिकांचा मेळा
26120
सावंतवाडीत रंगभूमीचा सोहळा, रसिकांचा मेळा
धारणकर स्मृती नाट्य महोत्सव; ‘लगोरी’, ‘देवराई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी, ता.२१ : येथील नगरपालिका आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनकर धारणकर स्मृती नाट्य महोत्सव शुक्रवारपासून येथील बॅ. नाथ पै सभागृहात उत्साहात सुरू झाला. भाजपचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, नगरपालिका महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, सचिव लक्ष्मण नाईक, नगरसेविका नीलम नाईक, सुनिता पेडणेकर, खजिनदार हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते.
क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष पुराणिक यांनी सांगितले, की बालकलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन नाट्य चळवळ व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात पाच संगीत नाटके रंगमंचावर आणण्याचे आमचे नियोजन आहे. सचिव लक्ष्मण नाईक यांनी प्रास्ताविकात नाट्य प्रेमींना या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ॲड. सावंत, ॲड. भांबुरे, दिपाली भालेकर, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर, सत्यजित धारणकर, सुरेश पुराणिक, विनायक गावस, रावजी पारसेकर, संजय नाईक, रुपेश राऊळ आणि नाट्य लेखिका आज्ञा कोयंडे यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवगड येथील ‘लगोरी’ आणि नेरूळ येथील ‘देवराई’ या नाटकांचे सादरीकरण झाले. उद्या (ता.२२) ‘वीज म्हणाली धरतीला’ हे नाटक सादर होणार आहे. गौरी घाटे यांनी सूत्रसंचालन केले. श्री नाईक यांनी प्रास्ताविक केले. महोत्सवासाठी गणेश दीक्षित, संदीप धुरी, उमा जडये, सृष्टी पेडणेकर, सिद्धार्थ नेरुरकर, गुरुप्रसाद चिटणीस, तेजस प्रभू देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---
सांस्कृतिक चळवळीला बळकटी!
श्री परब म्हणाले, ‘‘सावंतवाडीतील सांस्कृतिक व नाट्य चळवळ पुढे नेण्याचे काम कौतुकास्पद आहे. (कै.) दिनकर धारणकर यांची नाट्य विचारांची परंपरा पुढे जाणे आवश्यक असून, क्षितिज इव्हेंटने बालकलाकार घडवण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. पुढील वर्षी हा महोत्सव जिल्हास्तरावर नेण्यासाठी आणि तो अधिक दर्जेदार करण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेऊ. नगरपालिकेच्या सहकार्याने एप्रिल महिन्यात येथे एक भव्य दिव्य नाटक आयोजित केले जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

