झारापचा झेंडा राज्यात दिमाखात

झारापचा झेंडा राज्यात दिमाखात

Published on

26122

झारापचा झेंडा राज्यात दिमाखात

‘पंचायत प्रगती निर्देशांका’त अव्वल; आता मिझोरम-तेलंगणाशी थेट सामना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ : ‘पंचायत प्रगती निर्देशांक’अंतर्गत ‘स्वच्छ व हरित गाव’ या थीममध्ये तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने स्वयंमूल्यमापनात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. झारापची निवड केंद्रीय स्तरावर झाली आहे. तेलंगणा, मिझोरम या राज्यांशी स्पर्धा करण्यासाठी ही ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. या स्पर्धेत आता झाराप राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सरपंच दक्षता मेस्त्री व कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी झाराप येथे सांगितले.
‘पंचायत प्रगती निर्देशांक’अंतर्गत नऊ थीम येत असून यात ग्रामपंचायती आपण केलेल्या कामाचे स्वयंमूल्यमापन करतात. यात स्वच्छ आणि हरित गाव या थीममध्ये झारापने प्रथम क्रमांक प्राप्त केला. याचे केंद्रस्तरीय समितीकडून येत्या आठवड्यात परीक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावपातळीवर स्वच्छतेबाबत केलेल्या कामाची माहिती झाराप येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी झाराप पंचायत समिती सदस्य सीताराम तेली, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, ग्रामविस्तार अधिकारी संजय ओरोसकर व गजानन धरणे, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, ग्रामपंचायत अधिकारी सतीश साळगावकर व जी. सी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे सुनील प्रभू, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर, तसेच सीएचओ, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सरपंच सौ. मेस्त्री म्हणाल्या, ‘‘स्वच्छ व हरित गाव’अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर केंद्रीय सर्वेक्षण होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. आमच्या ग्रामपंचायतीला देशात प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. यासाठी भगीरथ व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. भगीरथ संस्थेचे डॉ. प्रसाद देवधर या ग्रामपंचायतीच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांचे सहकार्य मिळत आहे. ’’
श्री वालावलकर म्हणाले, ‘‘माझी वसुंधरा पोर्टलवरती राज्यातून ग्रामपंचायतींनी माहिती भरल्यानंतर या स्वयंमूल्यमापनात राज्यात झाराप ग्रामपंचायत नामांकन मिळवित अग्रेसर राहिली. गावाला ‘हरित ग्राम’ या नामांकनाच्या शर्यतीमध्ये केंद्रस्तरावर नंबर पटकावण्याची संधी आहे. ग्रामस्थ एकजुटीने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय समिती पाहणी करून गावातील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीसाठी ‘यशदा’ उपसंचालकचे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. ग्रामस्थांचे स्वच्छतेविषयी समुपदेशन करण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे.’’
श्री तेली म्हणाले, ‘‘हा गाव सुंदर व स्वच्छ बनत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या गावाचा आदर्श आजूबाजूची गावे देखील घेऊन आपले गावही स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न करतील.’’
दरम्यान, सतीश साळगावकर यांनी प्रास्ताविक केले. जी. सी. वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
--------
विकासासाठी स्पर्धा!
डॉ. देवधर म्हणाले, ‘‘शासन आता गावामध्ये स्पर्धात्मक विकास आणि विकासाची स्पर्धा असे दोन प्रकारे काम करीत आहे. प्रगतीच्या दृष्टीने गावात स्पर्धा लावून त्या माध्यमातून गाव  विकास होतोय का, हे पाहत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील आंबडोस, साळेल, तळवडे गाव देखील चर्चेत होते. मिझोरम व तेलंगणा यांच्याशी आता झाराप गावाची स्पर्धा होणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com