एप्रिल महिन्यातच हापूस बाजारात स्थिरावेल
‘हापूस’वर लहरी वातावरणाचा परिणाम
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता ; सामान्यांना एप्रिलमध्येच चव चाखायला मिळणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : आधी लांबलेला पाऊस मग थंडीचा लहरीपणा आणि आता पुनर्मोहराचा तडाखा! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत असल्याने जुनी फळधारणा धोक्यात आली आहे. फुलकिडीच्या (थ्रिप्स) प्रादुर्भावाने बागायतदारांच्या चिंतेत भर घातली आहे. या निसर्गाच्या खेळामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यंदा एप्रिल उजाडल्याशिवाय हापूसची पेटी बाजारात स्थिरावणार नाही, अशी स्थिती आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के तर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के मोहोर आला; परंतु, हा सर्व मोहोर जास्त थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे मोहोर चांगला आला असला तरी दहा टक्केदेखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे. आंबापिक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्युहात अडकल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाऊस लांबला त्यामुळे आंबा हंगाम लांबणार, असा सुरवातीचा अंदाज होता. नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंतची झाडे मोहोराने बहरली; पण त्यानंतर वातावरणातील बदलामुळे आंबा बागा काळवंडल्या आहेत. मोहोर अक्षरशः करपून गेला आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्चून खते, कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या झाडांवर केल्या आहेत याशिवाय कित्येक मजूर बागांमध्ये कामाला आहेत. दहा टक्के आंबा उत्पादनात उत्पादन खर्चदेखील भागण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू झाली; परंतु त्यावर देखील फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बागायतदार सर्व बाजूंनी अडचणीत आला असून, याच मोहोरावर आता उत्पादनाची अपेक्षादेखील आहे.
---
चौकट १
कोकण विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा
रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे ६७ हजार ७९० ते ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रात हापूस आंब्याची लागवड होते. हापूस उत्पादनात रत्नागिरी जिल्हा देशात आघाडीवर आहे. या पिकातून जिल्ह्यात सुमारे १२३.०६ हजार टन आंबा उत्पादन मिळते जे कोकण विभागातील उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा उचलते.
........
कोट
आंब्याला पुनर्मोहराची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेथे फळे लागली होती त्याच फांदीला पुन्हा मोहोर येतो आहे. त्यामुळे फळगळती होत आहे. नव्याने योणाऱ्या मोहोरावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे यंदा आंबा एप्रिलमध्ये बाजारात येईल.
– पांडुरंग पाटील, रामपूर बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

