आंबा पिकासाठी ‘एआय‘ आवश्यक

आंबा पिकासाठी ‘एआय‘ आवश्यक

Published on

26167

आंबा पिकासाठी ‘एआय’ आवश्यक

मनीष दळवी : जिल्हा परिषदस्तरावर ‘कृषी’चे प्रयत्न

वेंगुर्ले, ता. २१: घाटमाथ्यावर एआय टेक्नॉलॉजी वापरून उसाचे पीक दुप्पट केले आहे. त्याच धर्तीवर भविष्यात आपल्यालाही एआय टेक्नॉलॉजी वापरून आंबा पिकात प्रगती करावी लागेल. यासाठी जिल्हा परिषदस्तरावर कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पाठपुरावा करून पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधू. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज होती. आपण एकत्र आलात हीच मोठी ताकद आहे. आताच्या परिस्थितीचा विचार करता जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आंबा बागायदार शेतकरी बैठकीत दिली.
जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. अति थंडी, अति उष्णता असल्यामुळे आंबा फळे गळून नुकसान होत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या नुकसानीमुळे आंबा उत्पादक मेटाकुटीस आले आहेत. या परिस्थितीतवर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी व व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक नुकतीच श्री. दळवी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे झाली.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, जिल्हा आंबा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, रामेश्वर ट्रान्स्पोर्टचे जनार्दन पडवळ, आत्मा कमिटी अध्यक्ष नितीन मांजरेकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, नगरसेवक संदेश निकम, दाजी परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन कुबल, प्रकाश बोवलेकर, प्रणव नाडकर्णी, विलास ठाकूर, रमेश नार्वेकर, रमण वायंगणकर, कमलेश गावडे, उपेंद्र रावले, देवराज गवंडे, महादेव गावडे, विश्राम गावडे, तानाजी परब, विष्णू ऊर्फ दादा गावडे, बाळाजी प्रभू यांच्यासह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावर्षी अति थंडी व अति उष्णता या वातावरणातील बदलामुळे संपूर्ण मोहोर जळून गेला आहे. किटक व तुडतुडे यांचा मोठा परिणाम फळांवर झाला आहे. यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे औषध फवारणीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या हंगामात १० टक्केसुद्धा आंबा पीक नसल्याने औषध फवारणीचे पैसेही वसूल होणार नाहीत. याचा विचार करून सरकारने तत्काळ आर्थिक मदत करावी. यावेळी सध्याच्या परिस्थितीचे सरसकट सर्व्हे केल्यास त्याला दोन ते अडीच महिन्याचा कालावधी जाऊन शेतकरी हवालदिल होईल. यामुळे आंबा पिकाचे नमुना सर्व्हे करून तत्काळ आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी यावेळी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना केव्हाही एकत्र येऊन विविध विषयांवर विचारविनिमय किंवा बैठक घेण्यासाठी जिल्हा बँक शाखा वेंगुर्लेचे सभागृह कायमस्वरूपी उपलब्ध करून देऊ. शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही दळवी यांनी सांगितले.
---
कीटकनाशकांसह खतांबाबत तोडगा हवा
सध्याच्या वातावरणात फवारणी करणारी औषधेही फेल झाली आहेत. त्यामुळे पालकमंत्री यांनी औषध कंपन्या, कृषी विभाग, फळ संशोधन केंद्र यांची एकत्रित बैठक घेऊन खते, औषधे यावर चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com