तारांगणातील तेजस्विनी
अंतराळाचे अंतरंगी ..............लोगो
(८ फेब्रुवारी पान ६)
तारांगणातील तेजस्विनी
या सप्ताहाच्या अखेरीस २८ फेब्रुवारी रोजी देशभरात राष्ट्रीय विज्ञानदिनाचा जल्लोष असेल. यावर्षीच्या विज्ञानदिनाचे मुख्य सूत्र अत्यंत अर्थपूर्ण आणि भविष्यवेधी आहे. ‘विज्ञानातील महिला ः विकसित भारताची प्रेरणा.’ सर सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या ‘रामन इफेक्ट’ या नोबेल पारितोषिक विजेत्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो; मात्र, २०२६ मध्ये आपण केवळ भूतकाळातील शोधांचे कौतुक न करता भविष्यातील ‘विकसित भारता’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित करत आहोत. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटी ओलांडून भारतीय महिलांनी आता थेट मंगळ आणि सूर्यापर्यंत मजल मारली आहे.
-rat२१p५.jpg-
26O26164
- प्रा. बाबासाहेब सुतार
---
आपण भारतीय महिला आणि अंतराळ संशोधनाचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात ती दोन नावे, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स. कर्नालसारख्या छोट्या शहरातून नासापर्यंत पोहोचलेल्या कल्पना चावला यांनी आपल्या जिद्दीने अंतराळात भारताचे नाव कोरले. दुर्दैवाने, कोलंबिया शटल दुर्घटनेत त्या विश्वात विलीन झाल्या; पण त्यांचे बलिदान आजही हजारो मुलींना आकाशाकडे झेपावण्याचे धाडस देते. त्याचप्रमाणे, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहून आणि ‘स्पेस वॉक’ करून महिलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची साक्ष जगाला दिली. या दोघींनी भारतीय मुलींच्या मनात विज्ञानाची ज्योत पेटवली, तिचेच रूपांतर आज इस्रो आणि इतर भारतीय संशोधन संस्थांमधील महिलांच्या देदीप्यमान कामगिरीच्या ज्वालेत होत आहे.
कल्पना आणि सुनीता यांनी परदेशात राहून जी भरारी घेतली तीच जिद्द भारतात राहून इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांनी सिद्ध केली आहे. भारताच्या मंगळ मोहिमेच्या यशात उपसंचालक म्हणून रितू करिधाल यांची भूमिका निर्णायक होती. लहानपणापासून आकाश निरीक्षणात व्यग्र असलेल्या आणि चंद्राच्या कलांनी आश्चर्यचकित होणाऱ्या या लखनौच्या लहानग्या मुलीचे आज जगभर कौतुक होते आहे. ज्यांना आज आपण ‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखतो त्या ‘चांद्रयान-२’ सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या मोहिमेचे प्रकल्प संचालक म्हणून एम. वनिता यांनी धुरा सांभाळली आणि महिला नेतृत्व किती खंबीर असू शकते, हे दाखवून दिले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या ‘आदित्य-एल १’ या भारताच्या पहिल्या सौरमोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या निगार शाजी यांनी केले. सूर्यासारख्या तप्त ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह एका विशिष्ट बिंदूवर (एल १, पॉइन्ट) स्थिर करणे हे मोठे आव्हान होते, जे निगार शाजी आणि त्यांच्या टीमने लीलया पेलले तसेच, दीर्घकालीन यशस्वी ‘अॅस्ट्रोसॅट’ उपग्रह मोहिमेत डॉ. एस. सीथा यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
या आधुनिक यशामागे जुन्या पिढीतील महिला व पुरुष शास्त्रज्ञांचे मोठे कष्ट आहेत. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात, १९४०च्या दशकात बिभा चौधरी यांनी ‘कॉस्मिक रे’मधील मूलभूत कणांचा शोध लावला होता, ज्याचा उपयोग पुढे होमी भाभांसारख्या दिग्गजांना झाला तसेच, डॉ. निरुपमा राघवन यांनी १९६८ मध्ये सूर्यावरील डागांचा अभ्यास करून या क्षेत्रात महिलांसाठी पहिली वाट तयार केली. निरीक्षणात्मक खगोलशास्त्राच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या डॉ. निरुपमा राघवन या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. १९८२ मध्ये अमेरिकेहून सहकुटुंब मायदेशी परतल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील ‘नेहरू तारांगणा’त आपल्या कार्याला सुरुवात केली. खगोलशास्त्राची गोडी सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या तळमळीतून त्यांनी १९८५ मध्ये दिल्लीत ‘हौशी खगोलशास्त्रज्ञ संघा’ची स्थापना करून विज्ञानप्रसाराचे मोलाचे कार्य केले.
आज या वारशाचे नेतृत्व डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम् करत आहेत. त्या बंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स’च्या पहिल्या महिला संचालक तसेच सध्या कार्यरत आहेत. ताऱ्यांच्या समुहांचा अभ्यास आणि अतिनील किरणांच्या माध्यमातून ताऱ्यांची उत्पत्ती समजून घेण्यात त्यांचे कार्य मोलाचे आहे. लडाखमधील हन्ले येथील वेधशाळेत कार्यरत डॉ. जी. सी. अनुपमा यांनीही सुपरनोव्हा आणि गॅमा रे बर्स्टच्या अभ्यासात जागतिक दर्जाचे काम केले आहे. आज त्या सेवानिवृत्त आहेत.
सध्याच्या काळात तरुण महिला संशोधक खगोलविज्ञानाची क्षितिजे आणखी विस्तारत आहेत. पुण्यातील NCRA-TIFR च्या डॉ. प्रीती खरब या महाकाय GMRT दुर्बिणीचा वापर करून आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या ‘जेट्स’चा अभ्यास करत आहेत. प्रियांका चतुर्वेदी या आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहेत तर सुमाना नंदी या अवकाशातील गूढ ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’चा मागोवा घेत आहेत.
भविष्यातील सर्वात मोठ्या गुरूत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणाऱ्या ‘लीगो-इंडिया’ प्रकल्पातही महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यातील ‘आयुका’ च्या प्राध्यापिका देबारती चॅटर्जी या न्यूट्रॉन तारे आणि गुरूत्वीय लहरींच्या सिद्धांतावर काम करत असून, ‘लीगो-इंडिया’ प्रकल्पात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे तसेच, आंध्रप्रदेशच्या तरुण संशोधक डॉ. रागदीपिका पुचा यांनी तर बटू आकाशगंगांमधील कृष्णविवरांची संख्या आधीच्या अंदाजापेक्षा तिप्पट असल्याचे नुकतेच एक वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये शोधून काढून खगोलशास्त्रात मोठी भर घातली आहे.
राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने या ''तारांगणातील तेजस्विनीं''च्या संशोधन कार्याचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, विज्ञान संशोधन हे केवळ प्रयोगशाळेत घडत नाही तर ते स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांतून आणि त्यांच्या अथक परिश्रमातून घडते. स्व. बिभा चौधरीपासून ते निगार शाजींपर्यंतचा हा प्रवास हे सिद्ध करतो की, बुद्धिमत्तेला लिंगभेदाच्या सीमा नसतात. रत्नागिरी असो किंवा पुणे, आजच्या विद्यार्थिनींनी या शास्त्रज्ञांचा आदर्श घेतला तर ‘विकसित भारत’ खऱ्या अर्थाने साकार होईल.
(लेखक खगोलविज्ञानाचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

