हर्णेतील रखडलेले रस्ते दुरुस्तीचे काम अखेर सुरू
rat22p11.jpg
26378
दापोली ः सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोलीच्या कनिष्ठ अभियंता माळी यांना जाब विचारताना ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य.
rat22p12.jpg
26380
हर्णे : येथील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
हर्णेतील रस्ता दुरुस्तीचे काम अखेर सुरू
ज्येष्ठ नागरिक संघाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग; पर्यटकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ ः अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या हर्णे मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ज्येष्ठ नागरिक संघाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने कालपासून सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
हर्णे गावातील मुख्य रस्ता हा दापोली तालुक्यातील महत्त्वाचा दुवा आहे. महावितरणच्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. सुमारे १५ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, ‘‘रस्त्याचे काँक्रिटीकरण मंजूर झाले आहे, मग आता खड्डे कशाला भरता?’’ असे कारण पुढे करत एका स्थानिक ग्रामस्थाने या कामाला विरोध केला. आश्चर्य म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी या विरोधाची दखल घेत काम थांबवले आणि कंत्राटदार साहित्य घेऊन दुसऱ्या गावी रवाना झाला.
मुख्य रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’ राहिल्याने ज्येष्ठ नागरिक संघ संतापला. १७ फेब्रुवारी रोजी संघाच्या सदस्यांनी दापोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली. ‘‘कोणाच्या सांगण्यावरून लोकहिताचे काम थांबवले?’’ असा थेट सवाल त्यांनी कनिष्ठ अभियंता माळी यांना विचारला. तसेच, काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत लेखी निवेदन सादर केले.
संघाच्या या ठाम भूमिकेनंतर प्रशासकीय यंत्रणा हलली. अभियंत्यांनी तत्काळ कंत्राटदाराला सूचना देऊन २१ फेब्रुवारीपासून काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शनिवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. या यशस्वी पाठपुराव्यात संघाचे अध्यक्ष जगदीश उर्फ नाना देवरुखकर, सचिव प्रकाश चोपडे, चंद्रकांत चौधरी, विनोद पतंगे, सुरेश चोपडे, विजय निकम, अशोक डोईफोडे, मनोहर बटावळे आणि प्रकाश पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ग्रामस्थांकडून समाधान
खड्ड्यांमुळे अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी २०-२५ मिनिटे लागत होती. रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि मच्छीमार बांधवांना याचा मोठा फटका बसत होता. आता रस्ता दुरुस्त होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ‘‘सजग नागरिक आणि एकजूट असेल तर प्रशासन कसे ताळ्यावर येते, याचे हर्णे ज्येष्ठ नागरिक संघ हे उत्तम उदाहरण आहे,’’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

