पालीत ग्रामीण प्रज्ञावंतांची ''सुपर बॅच''
rat22p13.jpg-
26393
पाली - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी पाली येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी.
पालीत ग्रामीण प्रज्ञावंतांची ‘सुपर बॅच’
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी; गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्याचे ध्येय
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २२ ः ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्यासाठी रत्नागिरी पंचायत समितीच्या हातखंबा प्रभागामार्फत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून पाली शाळा क्रमांक १ येथे ‘विशेष शिष्यवृत्ती सुपर बॅच सराव परीक्षा व कार्यशाळा’ उत्साहात पार पडली.
हातखंबा प्रभागाचे विस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनुर यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रप्रमुख विष्णू पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. पंचायत समितीच्या ‘सेस फंड’ अंतर्गत यापूर्वी चार सराव परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. या परीक्षांमध्ये झरेवाडी, पाली आणि खानू या तिन्ही केंद्रांतील शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या निवडक २५ विद्यार्थ्यांची एक ''सुपर बॅच'' तयार करण्यात आली. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या तयारीला अंतिम हात फिरवण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते.
दिवसभर चालले ज्ञानसत्र या कार्यशाळेचे स्वरूप केवळ परीक्षेपुरते मर्यादित नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यावर अधिक भर देण्यात आला. मारुती घोरपडे यांनी दोन्ही प्रश्नपत्रिकांमधील कठीण प्रश्न आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या चुकांचे विश्लेषण करून मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख विष्णू पवार यांनी परीक्षेला सामोरे जाताना लागणारा सभाधीटपणा, मानसिक स्थिरता आणि वेळेचे नियोजन याबाबत सोप्या क्लुप्त्या सांगितल्या. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली.
या सराव परीक्षेत केंद्र शाळा पाली, झरेवाडी, खानू, साठरे नं. २, वेळवंड कोठारवाडी, हातखंबा बोंबलेवाडी या शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, रामनाथ बने (झरेवाडी), संजय शेलार (खानू), स्नेहल तेंडुलकर (साठरे), माधुरी शिंदे-पाटील (कशेळी), स्नेहा ठाकरे (नाणीज गावडेवाडी) आणि सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर तेंडुलकर यांनी परीक्षक व मार्गदर्शक म्हणून सहकार्य केले.
दरम्यान, ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेली बुद्धिमत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा दिल्यास, येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत या उपक्रमाचा वाटा निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

