ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाचा शंखनाद

ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाचा शंखनाद

Published on

-rat२३p९.jpg-
२६O२६६७५
रत्नागिरी ः येथील ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवासंदर्भात आयोजित बैठकीला उपस्थित मानकरी.
----
श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाचा शंखनाद
२ मार्चपासून उत्सवाला प्रारंभ; रंगपंचमीला सांगता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई देवस्थानचा पारंपरिक शिमगोत्सव यंदा २ मार्चपासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून ते रंगपंचमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा सविस्तर कार्यक्रम देवस्थान ट्रस्टच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे.
उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी २ मार्चला रात्री १० वा. झाडगाव सहाणेवरून मानकरी, ट्रस्टी आणि ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने श्रीदेव भैरी मंदिरात जातील. मध्यरात्री १२ वा. श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरीच्या भेटीसाठी आणि होळी उभी करण्यासाठी मंदिराबाहेर पडेल. पहाटे ३ वा. श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होईल. झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भवनमार्गे पहाटे ५ वाजता मांडवी येथे पोहोचेल. त्यानंतर विलणकरवाडी, खडपेवठारमार्गे सकाळी १० वा. गोडीबाव तलाव आणि ११:३० वा. राममंदिर येथे पालखीचे आगमन होईल. दुपारी मुरूगवाडा येथून होळीचा शेंडा घेऊन पालखी झाडगाव सहाणेवर पोहोचेल, जिथे दुपारी ३ वा. पारंपरिक पद्धतीने होळी उभी केली जाईल. ३ मार्च रोजी रात्री ९ वा. धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरून निघेल. ही धुळवड शहरातील विविध वठारांतून फिरून रात्री उशिरा राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात जाईल. येथे मुस्लिम मानकरी काद्री यांना देवस्थानतर्फे श्रीफळ देऊन त्यांची गळाभेट घेतली जाईल, जे रत्नागिरीच्या जातीय सलोख्याचे प्रतीक आहे. ४ मार्चला दुपारी १२ वा. धुळवडीचा कार्यक्रम होईल. ४ ते ७ मार्च या कालावधीत श्रीदेव भैरीची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी झाडगाव सहाणेवर विराजमान असेल. या चारही दिवसांच्या रात्री १० ते १२ या वेळेत पारंपरिक ढोलताशांच्या गजरात पालखी नाचवण्याचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रंगणार आहे. ७ ला दुपारी १२ वा. पालखी मुरूगवाडा ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरून उठेल. पंधरामाडापर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून रात्री १० वाजता पालखी पुन्हा झाडगाव सहाणेवर परत येईल. रविवारी (ता. ८) रंगपंचमीच्या दिवशी दुपारी १ वा. पालखी पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेऊन रंग खेळण्यासाठी बाहेर पडेल. शहरातील विविध नाक्यांवरून फिरत ही पालखी रात्री ९ वा. ढमालणीच्या पारावर येईल. त्यानंतर रात्री ११:३० वा. पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात दाखल होईल. मध्यरात्री धुपारती आणि गाऱ्हाणे होऊन या दिमाखदार उत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com