दुबईत घुमला शिवजयंतीचा जयघोष

दुबईत घुमला शिवजयंतीचा जयघोष

Published on

rat23p1.jpg-
26O26657
रत्नागिरी- आखातामधील युएईमध्ये शिवजयंती साजरी करताना अॅड. जया सामंत. सोबत चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव, युयुत्सू आर्ते आदी.
-------
दुबईतही दुमदुमला शिवजयंतीचा जयघोष
मराठी बांधवांचा सहभाग; ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा वारसा विसरू शकत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आली. दुबईतील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूल येथे १५ फेब्रुवारीला शिवजयंतीचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘इन्स्पायर इव्हेंट्स युएई’ यांच्यावतीने आयोजित या सोहळ्याचे हे सलग आठवे वे वर्ष होते.
दुबईत रंगलेल्या या दिमाखदार कार्यक्रमाला महाराष्ट्रातून प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड. जया सामंत खास उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी तेथील मराठी ‘डायस्पोरा’ला (स्थायिक समाज) संबोधित करताना आयोजकांच्या धाडसी प्रयत्नांचे आणि कलाकारांच्या कौशल्याचे तोंडभरून कौतुक केले. ‘परदेशात राहूनही आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख करून देण्याचे मोलाचे कार्य तुम्ही करत आहात ही अभिमानास्पद बाब आहे,’ असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला, लेझिम आणि इतर सांस्कृतिक आविष्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले ते ‘श्रीमंत ढोलताशा पथक युएई’. त्यांच्या ढोलताशांच्या गजराने दुबईचा परिसर भक्तिमय झाला होता. या सादरीकरणात महाराष्ट्रातील २० हून अधिक कोकणी कलाकारांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला अस्सल कोकणी मातीचा सुगंध लाभला. आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांची मूल्ये आणि मराठी संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने इन्स्पायर इव्हेंट्स युएई'' अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. आपली भाषा, संस्कृती आणि मराठी बाणा असाच जगभर पसरत राहो, अशी भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

---
चौकट

आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला झेंडा

दुबईत झालेल्या या कार्यक्रमात एक हजाराहून अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव व इतर सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली व अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला. या कार्यक्रमाला दुबईतील उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले.

Marathi News Esakal
www.esakal.com