''ऑलिव्ह रिडले'' कासवाला दिले जीवदान

''ऑलिव्ह रिडले'' कासवाला दिले जीवदान

Published on

rat२३p१४.jpg-
P२६O२६६८०
कासवाला जाळ्यातून सोडवताना नीलेश पडवळ.
-----
‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला दिले जीवदान
दाभोळ बंदरातील घटना; मच्छीमार पडवळ यांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २३ : तालुक्यातील दाभोळ येथील समुद्रात मासेमारी करत असताना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाला मच्छीमार नीलेश पडवळ यांनी जाळ्याचे आर्थिक नुकसान पत्करून जीवदान देत सुखरूप समुद्रात सोडले. निसर्गाशी जुळलेले कोकणातील मच्छीमारांचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना दाभोळ बंदरात घडली.
दाभोळ येथील मच्छीमार नीलेश पडवळ हे २० रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या होडीने समुद्रात मासेमारी करत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी जाळे टाकले आणि काही वेळाने ते ओढू लागले; मात्र जाळे जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. माशांसोबत एक मोठे कासव त्यात अडकले असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिस्थितीचा अंदाज घेतला. जाळ्यात अडकलेल्या कासवाची धडपड सुरू होती. अशा वेळी जाळे फाटण्याची किंवा कापावे लागण्याची शक्यता असते. मासेमारीची जाळी महागडी असल्याने मच्छीमारांसाठी तो मोठा आर्थिक तोटा ठरू शकतो. तरीही पडवळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्री जीवाच्या रक्षणाला प्राधान्य दिले. अत्यंत कौशल्याने आणि संयमाने त्यांनी जाळे सैल करत कासवाची सुरक्षित सुटका केली आणि खोल समुद्रात त्याला मुक्त सोडले.
कोकण किनारपट्टीवर सध्या कासव संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर एका सामान्य मच्छीमाराने दाखवलेली ही पर्यावरण जाणीव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छीमारांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली.
-----
कोट
समुद्र आमचा पोशिंदा आहे आणि त्यातील जीव वाचवणे, हे आमचे कर्तव्य आहे. जाळे पुन्हा दुरूस्त करता येते; पण गेलेला जीव परत आणता येत नाही. म्हणूनच कासवाला मुक्त केले.

- नीलेश पडवळ, मच्छीमार, दाभोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com