दर्जेदार रुग्णसेवेसह आयसीयू युनिट सुरू करू ः इनामदार
26800
दर्जेदार रुग्णसेवेसह आयसीयू
युनिट सुरू करू ः इनामदार
वैद्यकीय अधीक्षपदाचा पदभार
कणकवली, ता. २४ : येथील उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना चांगली सेवा मिळावी. दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. निलिमा इनामदार यांनी दिली.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.इनामदार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ.पंकज पाटील, रूग्णालय समन्वयक प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते. डॉ.इनामदार म्हणाल्या, ‘‘कणकवली उपजिल्हा रूग्णालयात येत्या काही दिवसांत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. अस्थी रोग, त्वचा रोग आदींचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. लवकरच स्त्री रोग तज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रूग्णांवर उपचार व्हावेत याला प्राधान्य असणार आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘पदभार स्वीकारल्यानंतर उपजिल्हा रूग्णालयाची संपूर्ण पाहणी केली. यात दुरूस्तीचे काम सुरू असल्याने आयसीयु युनिट बंद असल्याची बाब निदर्शनास आली. बांधकाम खात्याकडे त्याबाबतचा पाठपुरावा करून हे युनिट तातडीने सुरू करण्याला आमचे प्राधान्य आहे.’’ दरम्यान, रुग्णालयातील स्वच्छता, वेळेवर उपचार, औषधांचा पुरवठा आणि रुग्णांशी संवेदनशील वागणूक यावर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी शासकीय आरोग्यसेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.’’

