दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार
दुसरी ते चौथीसह सहावीचा अभ्यासक्रम बदलणार
नवीन शैक्षणिक धोरण ; अंमलबजावणी होणार लवकरच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये आगामी शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून सेतू अभ्यासपुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसतखेळत कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षण विभागाचा भर असणार आहे. या धोरणानुसार, पारंपरिक प्रणालीऐवजी बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षणाची एक अखंड साखळी तयार करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांना सहज जुळवून घेता यावे, यासाठी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विशेष सेतू अभ्यासपुस्तिका तयार केली जात आहे.
अभ्यासक्रम बदलाच्या नियोजित वेळापत्रकानुसार, २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी तर २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाईल. शासनाने शिक्षणाची विभागणी बालवर्ग ते दुसरी (पूर्व प्राथमिक), तिसरी ते पाचवी (प्राथमिक), सहावी ते आठवी (माध्यमिक) आणि नववी ते बारावी (उच्च माध्यमिक) अशी केली आहे. या बदलांमधून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर अधिक भर दिला जात आहे. एनसीईआरटी (NCERT)आणि राज्य परिषदेच्या पुढाकाराने लागू होणाऱ्या या नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, आनंददायक, समावेशी आणि मूल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. यात संख्याज्ञान, भाषा, तार्किक विचार, जीवनकौशल्ये आणि सर्जनशीलता यांसोबतच स्थानिक गरजांनुसार विषयवस्तू समाविष्ट केली जाणार आहे. पाठ्यपुस्तकांची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीमार्फत केली जाईल. केंद्रस्तरीय अभ्यासक्रमाच्या निर्देशानुसार, राज्याभिमुख बदल, शिक्षकांचे प्रशिक्षण, समग्र मूल्यांकन पत्रक, सेतू अभ्यासक्रम तसेच शालेय वेळापत्रक आणि सत्रप्रणालीतही व्यापक सुधारणा केल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

