राजापूर-काजूच्या घटत्या उत्पादनाने शेतकर्याची कोंडी
26944
O26947
ग्राऊंड रिपोर्ट - लोगो
rat२४p५.jpg
२६८९६
राजापूर ः काजू बी लगडलेली कलमे.
rat२४p६.jpg-
२६८९७
ओले काजूगर
----------
काजूच्या घटत्या उत्पादनाने शेतकऱ्यांची कोंडी
जमा-खर्चासाठी तारेवरची कसरत; अर्थकारण बदलतंय
इंट्रो
प्रतिकूल हवामान, कीडरोगाचा प्रादुर्भाव यांसह अन्य विविध कारणांमुळे काजूचे उत्पन्न घटल्याचे चित्र दिसत आहे. त्यातून, हापूस आंब्याप्रमाणे काजूचाही जमाखर्चाचा मेळ बसवताना शेतकरी, बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना जादा दर मिळत असल्याने शेतकरी वा बागायतदारांकडून सुक्या काजूबियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. चविष्ट अन् पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगरांना प्रतिकिलो आठशे-हजार रुपयांपासून सोळाशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरीही सुकी काजू बी विक्रीऐवजी ओले काजूगर विक्री करण्याला प्राधान्य देताना दिसत आहे. त्यातून, लाखो रुपयांच्या होणाऱ्या उलाढालींचा विचार करता काजूचे अर्थकारण बदलत चालल्याचे चित्र आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
---------------
कीडरोगांचा प्रादुर्भाव
गेल्या काही वर्षामध्ये ओसाड असलेले माळरान रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातून ओलिताखाली येऊन काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत. काजूला मोठ्या प्रमाणात असलेल्या बाजारपेठेतील मागणीचा विचार करून काजूचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांकडून हंगामामध्ये खतांची मात्रा दिली जाते. हापूस आंब्याप्रमाणे काजू उत्पादनालाही प्रतिकूल हवामान आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाचा दरवर्षी फटका बसत असून, त्यातून, काजूचे उत्पादन घटत आहे. यावर्षीही सरासरी ३० ते ३५ टक्के काजूचे उत्पादन आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध फवारणी केली जाते. खते, फवारणी या खर्चासह कामगारांची मजुरी या साऱ्यांसाठी करावा लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेमध्ये काजूविक्रीतून उत्पन्न कमी मिळत आहे. त्यातून, खर्च आणि उत्पन्नाचे मेळ बसवताना शेतकरी आथिक कोंडीत सापडताना दिसत आहे.
---------
चौकट
दरातील अस्थिरता मारक
काजूचे दर हे आयात काजूच्या दरासह देशातील एकूण काजू उत्पादनावर अवलंबून असतो. नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे आधीच काजूचे उत्पादन घटले आहे. त्यामध्ये परदेशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात काजूबी आयात होत असते. भारतामध्ये प्रतिकूल हवामान आणि कीडरोगांमुळे काजूचे उत्पादन घटले असले तरी टांझानिया, घाना आदी आफ्रिकन देशामध्ये जंगली काजूचे उत्पादन वाढले असून, त्यांचा दरही तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. गतवर्षी आयात (इम्पोर्टेड) काजूचा दर सरासरी ८० रु. किलो होता. त्याचाही काजू बीच्या दरावर प्रतिकूल परिणाम होऊन बी चे दर अस्थिर राहतात. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्न अन् आर्थिक उलाढालीवर होताना दिसत आहे.
-----------
परदेशी काजू आयातीचा प्रतिकूल परिणाम
विविध प्रक्रिया उद्योगांसाठी काजूगरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर आणि अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेमध्ये कमी असतो. त्यामुळे नफ्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रक्रिया उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून सिंगापूर, आफ्रिका, ब्राझिल, व्हिएतनाम आदी देशांमधून मोठ्या प्रमाणात काजू बी भारतामध्ये आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदीदरावर होताना दिसत आहे.
------------
सुक्या काजूबियांच्या दरामध्ये सातत्याने घसरण
उन्हाच्या सहाय्याने चांगल्या सुकलेल्या या बियांना बाजारामध्ये चांगलीच मागणी असते. त्यातून, चांगलाच दरही मिळतो. त्यामुळे शेतकर्यांकडून वा बागायदारांकडून ओल्या काजू झाडांवर सुकण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. त्याचवेळी ओले काजू काढून ते उन्हामध्ये सुकवले जातात; मात्र, गेल्या काही वर्षामध्ये सुक्या काजू बियांच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला प्रतिकिलो १५०-१६० रुपये असणारा दर उत्तरार्धामध्ये ५० - ६० रुपयांवरही येऊन ठेपलेला असतो. सातत्याने बदलणाऱ्या आणि घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांना सुक्या काजू बी विक्रीतून समाधानकारक उत्पन्न मिळताना दिसत नाही.
------------
ओल्या काजूगरांना चांगला दर
सुक्या काजू बीच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने त्यातून, शेतकर्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्याचवेळी सुक्या काजू बीच्या तुलनेमध्ये ओल्या काजूगरांना चांगला दर मिळताना दिसत आहे. सद्यःस्थितीमध्ये ओल्या काजूगरांना प्रतिकिलो आठशे रुपयांपासून सोळाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ओल्या काजूगरांना मिळणारा दर सुक्या काजू बीच्या तुलनेमध्ये जादा असल्याने समाधानकारक आणि चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांकडूनही ओले काजूगर विक्रीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.
----------
काजूगरांना मोठी मागणी
ओल्या काजूगरांना स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. जानेवारीपासून ओले काजूगर स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी येतात. स्थानिक बाजारपेठेप्रमाणे मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमधूनही ओल्या काजूगरांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षामध्ये कोकणातील ओल्या काजूगरांना महाराष्ट्रातील मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसह कर्नाटक राज्यातील बंगळूरू, दिल्ली आदी राज्यांमध्येही मागणी वाढली आहे. भारतातील अनेकजण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणानिमित्ताने परदेशामध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडून ओल्या काजूगरांना मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीमुळे कोकणातील ओल्या काजूगराने सातासमुद्राच्या कक्षाही ओलांडल्या आहेत.
-----------
ओल्या बियातून काजूगर
काढण्याची पारंपरिक पद्धत
काजूच्या सुक्या बिया फोडण्याची जशी पारंपरिक पद्धत आहे तसे सुक्या बिया फोडण्याचे यंत्र वा कटर विविध कंपन्यांनी विकसित केले आहेत. त्याच्या सहाय्याने कमी कालावधीमध्ये जादा बिया फोडणे शक्य होत आहे; मात्र, ओल्या बिया फोडून त्यातून काजूगर काढण्याचे यंत्र फारशा प्रमाणात विकसित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे आजही पारंपरिक पद्धतीने ओले काजू फोडून त्यातून काजूगर काढले जात आहेत. त्यामध्ये छोट्या टोकदार काठीच्या सहाय्याने काजू बी फोडल्यानंतर त्याच्यातून हाताने काजूगर काढला जातो. ओल्या बी मधून काजूगर काढणे मोठ्या कौशल्याचे काम आहे. काजूगर काढण्यासाठी जुने वा काहीसे परिपक्व झालेल्या काजू बीचा वापरला जातो.
-----------
सुक्या आणि ओल्या काजुगरातील अर्थकारण
सुक्या काजू बीच्या एका किलोमध्ये सरासरी ६०० ते ९०० बियांचा समावेश असतो. ओल्या काजूंचा विचार करता साधारणतः २८० ते ३६० ओल्या काजू बी फोडल्यानंतर त्याच्यातून एक किलोएवढे ओले काजूगर मिळतात. ओल्या काजूगराला मागणीप्रमाणे मिळणार्या दराचा विचार करता एका काजूगराला सरासरी २.७० ते ६ रु. भाव मिळतो. सुक्या काजूबियांच्या दराच्या तुलनेमध्ये ओल्या काजूगरांना मिळणारा दर तुलनात्मकदृष्ट्या जास्त दिसत आहे.
........
दृष्टिक्षेपात सुकी काजू बी दर
सुकी काजू बी दर ः लहान काजू बी ः ६० ते ७० रु., मोठी काजू बी सरासरी १६५-१७० रु.
..........
दृष्टिक्षेपात ओले काजूगर दर
प्रतिकिलो ः १ हजार ते १ हजार ६०० रु.
............
चौकट ः
दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा
काजूचे एकूण क्षेत्र ः १ लाख १० हजार हेक्टर
काजूचे उत्पादन ः हेक्टर ३ टन
सरासरी उलाढाल ः १५० कोटी
सरासरी काजूबोंडाची निर्मिती ः ६० टक्के
----------
कोट ः
पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताने ओल्या काजू बिया फोडून काजूगर काढतो. सर्वसाधारणतः दीड-दोन तासामध्ये एक-दीड किलो काजू बिया फोडून होतात. त्यामध्ये काजू बिया फोडून काजूगर काढण्यासाठी शेकडा ४० रु. दर मिळतो. काजू बी फोडण्यातून सरासरी पाचशे ते सहाशे रुपये काही तासाच्या कालावधीमध्ये कमवता येतात. घरची दैनंदिन कामे करून फावल्या वेळेमध्ये हे काम करणे शक्य असल्याने त्यातून, स्वतःसह कुटुंबालाही आर्थिक हातभार लावता येतो.
- लक्ष्मी चौगुले
-----------
कोट
ओल्या काजूगरांना स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह परराज्यामध्येही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामध्ये सरासरी ८०० ते १२००-१४०० रु. असा चांगला दरही मिळतो. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सरासरी दीड ते दोन टन ओल्या काजूगरांची विक्री करतो. त्यातून, लाखो रुपयांची उलाढाल होते.
--राजेश शिंदे, विक्रेता
---------
चौकट
ओल्या काजूगराची उलाढाल
ओले काजूगर विक्री ः ४० ते ५० टन
आर्थिक उलाढाल ः ४ ते ५ कोटी
-----------
दृष्टिक्षेपात महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य काजू पिकाखालील क्षेत्र ः सुमारे १९१ लाख हेक्टर
महाराष्ट्रातील काजू उत्पादन ः सुमारे १.८१ लाख मेट्रिक टन
महाराष्ट्राची काजू उत्पादकता ः ९८२ किलो/हेक्टर
महाराष्ट्रातील काजूपिक असलेले प्रमुख जिल्हे ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पालघर
काजूला जीआय मानांकन मिळालेला भाग ः वेंगुला (जि.सिंधुदुर्ग)
...............
प्रतिकूल वातावरणाचा काजूला असा फटका
मोहोर आणि फळधारणेचे प्रमाण घटले
वाढत्या तापमानामुळे काजू बीची साईज घटली, सोबत पोचटपणा वाढला
टी मॉस्किटो, करपारोगांसह फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव
प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर काळवंडला, मोहोराला गळती
उत्पादनामध्ये घट होऊन सरासरी ४०-४५ टक्के उत्पादन
..........
काजूच्या संकटाची ही आहेत कारणे
प्रतिकूल हवामान, व्यवस्थापन खर्चात दुपटीने वाढ
खते, फवारणीच्या दरात वाढ
काजू बीचे दर जैसे थे
मनुष्यबळाचा अभाव
कमी आयात करामुळे परदेशी काजूचा दर कमी
स्थानिकपेक्षा परदेशी काजूला अधिक मागणी
कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू बी खरेदी
हमीभावाचा अभाव
...................
काय आहेत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या....
काजूचा हमीभाव निश्चित करावा
आयात परदेशी काजूवर करवाढ करावी
कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळावे
घाऊक व्यापारी आणि कंपन्यांच्या मनमानीला चाप
काजूबोंडावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी
काजू उद्योगासाठी मशिनरी निर्मितीवर संशोधन व्हावे
उत्तम रोगप्रतिकारशक्तीच्या जाती तयार कराव्यात
औषध आणि खतांवरील जीएसटी दर कमी करावा
गोदामासारखी साठवणूक यंत्रणा उभारावी
-------------
उत्पादन निम्म्यावर, खर्चात वाढ
सातत्याने कमी-जास्त होणारे तर कधी वाढणारे तापमान, सातत्याने किडीचा प्रादुर्भाव आणि पाऊस याचा काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. यातून, काजूच्या उत्पादनामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सुमारे पन्नास टक्क्यांनी घट झाल्याची माहिती शेतकर्यांकडून सांगितली जात आहे. उत्पादन घटले असले तरी काजू उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ होऊ लागली आहे. किडीचा प्रादुर्भाव आणि वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन होणारे नुकसान रोखण्यासाठी फवारणीसह अन्य उपाययोजना सातत्याने कराव्या लागत आहे. आधीच मनुष्यबळ कमी, त्यामध्ये मजूरीचे वाढलेले दर आणि त्यामध्ये आता फवारणी, खतांची मात्रा यांवर होणारा खर्च असा एकंदरीत, खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने काजू बागायतीही खर्चिक ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

