कलाकारांनी बोलल्यावरच 
सत्ताधाऱ्यांना जाग येते का?

कलाकारांनी बोलल्यावरच सत्ताधाऱ्यांना जाग येते का?

Published on

कलाकारांनी बोलल्यावरच
सत्ताधाऱ्यांना जाग येते का?

मनसेचा आरोप; मालवणमधील नाट्यगृह

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाची झालेली दुरवस्था आणि त्याबाबत ‘आमने-सामने’ नाटकातील कलाकारांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. कलाकारांनी वास्तव मांडल्यानंतर खडबडून जाग आलेल्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी जोरदार टीका केली आहे. केवळ कलाकारांनी बोलल्यावरच सत्ताधाऱ्यांना जाग येते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
श्री. वाईरकर यांनी पत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, कलाकारांच्या तक्रारीनंतर स्थानिक वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. त्यानंतर ‘फोडाफोडीच्या’ राजकारणात व्यस्त असलेले पुढारी आता आम्ही सक्षम आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वर्षभरापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाट्यगृहासाठी निधी जाहीर केला होता. तो निधी नेमका कुठे गेला आणि घोषणा हवेतच का विरली? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी जनतेला द्यावे. ‘पार्लमेंट टू पंचायत’ अशी एकहाती सत्ता असतानाही नाट्यगृहाच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ का मिळाला नाही?
---------
...तर शहराला समस्यांचा विळखा
केवळ नाट्यगृहच नाही, तर मालवण शहराला अनेक समस्यांनी विळखा घातला असल्याचे वाईरकर यांनी निदर्शनास आणून दिले. यात शहरात वाढत असलेली अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या, पर्यटनासाठी प्रसिद्ध असूनही दर्जेदार स्वच्छतागृहांची वानवा, वाहतूक कोंडी आणि पार्किंग नियोजनाचा अभाव यांचा समावेश आहे. तीन वर्षांत सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईरकर यांनी केले आहे. या संदर्भात मनसेकडे काही ठोस उपाययोजना असून त्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात होणाऱ्या विकासकामांवर मनसेचे बारकाईने लक्ष असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com