भगवान परशुराम चषक वीर सावरकर संघाने जिंकला
वीर सावरकर संघाकडे परशुराम चषक
गुहागरमध्ये क्रिकेट स्पर्धा ; देवगडचा ब्रह्म बॉईज उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ : गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरी येतील वीर सावरकर संघाने पटकावले. ब्रह्म बॉईज देवगड हा संघ उपविजेता ठरला.
गुहागरमधील ब्राह्मण समाजातील युवक गेल्या वर्षीपासून भगवान परशुराम चषक या नावाने क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आहेत. स्पर्धेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातील १४ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील उपांत्यफेरीचे सामने गुहागर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या संघात खेळवले गेले. स्पर्धेचा अंतिम सामना देवगड विरुद्ध रत्नागिरी असा रंगला. संपूर्ण स्पर्धेत वीर सावरकर रत्नागिरी संघाचे दोन खेळाडू वैभव जोशी आणि संकेत रानडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यात वीर सावरकर संघाने चार षटकांत धावसंख्येचा डोंगर उभा केला. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या ब्रह्म बॉईजला साखळी सामन्यातील लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यातच वीर सावरकर संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना चार झेल घेतले. परिणामी, सामना एकतर्फी वीर सावरकर संघाने जिंकला. अंतिम सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करणारा संकेत रानडेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
विजेत्या वीर सावरकर संघाला ३३ हजार ३३३ रुपये आणि भगवान परशुराम चषक देण्यात आला. उपविजेत्या बह्म बॉईज देवगड संघाला २२ हजार २२२ रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.

