-१२ पाणी योजनांना गती देण्यासाठी ५१ कोटींची गरज

-१२ पाणी योजनांना गती देण्यासाठी ५१ कोटींची गरज

Published on

‘त्या’ पाणी योजनांसाठी ५१ कोटींची गरज
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ; ठेकेदारांची ३५ कोटींची कामे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ४५५ कोटी १६ लाखांच्या सुधारित आराखड्याच्या जिल्ह्यात १२ पाणी योजना सुरू आहेत. या योजनांवर आतापर्यंत १९८ कोटी ७१ लाख निधी खर्च झाला आहे. ठेकेदारांनी ३५ कोटींची कामे केली आहेत. १६ कोटी ५५ लाख ठेकेदारांची बिले प्रलंबित आहेत. अशा प्रकारे या योजनांनी गती घेण्यासाठी सुमारे ५१ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी न मिळाल्याने योजनांची कामे खोळंबली आहे. शासनाने मार्चपूर्वी निधी वितरित केल्यास या कामांना गती मिळणार आहे अन्यथा जलजीवन मिशनच्या पाणी योजनाची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे (हर घर जल) उद्दिष्ट आहे. १,४००हून अधिक गावांसाठी साडेसातशे कोटींहून अधिक रकमेच्या योजना प्रस्तावित आहेत. अनेक गावांमध्ये कामे प्रगतिपथावर आहेत. यातील १२ योजना महाराष्ट्रा जीवन प्राधिकरणाकडे आहेत. त्यामध्ये जयगड प्रादेशिक पाणी योजना टप्पा २ कळझोंडी धरण, मिऱ्या-शिरगाव- निवळीतिठा व अन्य ३४ गावांसाठीची योजना, राजापुरातील पांगरेबुद्रुक प्रादेशिक योजना, संगमेश्वर प्रादेशिक योजना, चिपळूणमधील ओवळी-कळकवणे-वालोटे प्रादेशिक योजना, चिपळूणमधील वाशिष्टी खोरे कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजना, सावर्डे पाणी योजना, हर्णै प्रादेशिक पाणी योजना, दापोलीतील जालगाव-ब्राह्मणवाडी पाणी योजना, दापोलीतील पालगड पाणी योजना, बुरोंडी पाणीपुरवठा योजना आणि गुहागर येथील धोपावे पाणी योजनेचा यामध्ये समावेश आहे.
या योजनांची किंमत ४१० कोटी ५८ लाखएवढी होती; परंतु आता सुधारित आराखड्यानुसार, या १२ योजनांची अंदाजित रक्कम ४५५ कोटी १६ लाख एवढी झाली आहे. या योजनांवर आतापर्यंत १९८ कोटी ७१ लाख निधी खर्च झाला आहे. ठेकेदारांनी योजनांचा निधी मिळणार असल्याने आणि काम खोळंबू नये यासाठी ३५ कोटींची कामे केली आहेत तसेच केलेल्या कामांची १६ कोटी ५५ लाखाची बिले प्रलंबित आहेत. योजनांच्या कामाला गती मिळण्यासाठी एकूण ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.
----

Marathi News Esakal
www.esakal.com