त्या चार कामांना स्थगिती देण्याचा शिवसेनेचा निर्णय
‘त्या’ चार कामांना स्थगिती देणार?
शिवसेनेचा निर्णय ; ‘पार्टी मीटिंग’मध्ये चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : रत्नागिरी पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आधी पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी दिल्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांना भोवण्याची शक्यता आहे. या प्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे २६ला होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील रणनीती आज झालेल्या पार्टी मीटिंगमध्ये ठरवण्यात आली. त्यामध्ये ‘त्या’ चार कामांना पुढील सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्याबाबत शिवसेनेने निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी नगरपालिकेची ३० जानेवारीला पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यात आधीच पूर्ण झालेल्या कामांना नव्या पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचा प्रकार पुढे आला. याबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला. त्यामध्ये प्रभाग क्र. १४ मधील पालिकेची शाळा क्र. ३ समोरील व्यायामशाळेच्या बांधकामाचे ३० लाखाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडण्यात आले होते; मात्र हे काम मंजुरीपूर्वीच पूर्ण झाले आहे. रस्त्यावर पेवरब्लॉक बसवणे, आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभीकरण व अन्य कामांचा समावेश होता. याबाबत कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
प्रशासकीय काळात पूर्ण झालेल्या कामांचे अंदाजपत्रक मंजूर केल्याच्या ठरावाला विरोध झाल्यामुळे आता गुरूवारी (ता. २६) होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण झालेल्या कामांना स्थगित करण्याचा ठराव मांडण्याचा निर्णय शिवसेनेच्या पार्टी मीटिंगमध्ये घेण्यात आली आहे. भविष्यात नगरसेवक अडचणीत येऊ नयेत याबाबत ही भूमिका घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे तसेच प्रशासनाच्या कालावधीत ही कामे झाल्यामुळे त्याची चौकशी समितीमार्फत करून त्यानंतर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशीही चर्चा करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

