सामाजिक सलोखा आणि जबाबदारीचे भान राखा

सामाजिक सलोखा आणि जबाबदारीचे भान राखा

Published on

उत्सवात सामाजिक सलोखा अन् जबाबदारीचे भान राखा
जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन; सायले येथे ग्रामस्थांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २५ : शिमगोत्सवात गावाबाहेरील व्यक्तींकडून होणारा सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि पालखीतील दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सायले ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन देवरूख पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले. तसेच सामाजिक सलोखा आणि जबाबदारीचे भान राखून उत्सव साजरा करा, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले.
ग्रामपंचायत सायले येथे शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. झावरे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, बीट अंमलदार आर्या वेळवणकर, हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, हेड कॉन्स्टेबल श्रीमती कुरणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सायले गावचे पोलीस पाटील शरद सोनाजी कदम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पोलीस अधिकारी, गावप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच व ग्रामस्थ यांच्या स्वागताने झाली.
याप्रसंगी सचिन कामेरकर यांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना, गावप्रमुखांना आपापल्या गावात शिमगोत्सव काळात उद्‍भवणाऱ्या समस्या व होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा मांडण्याची विनंती केली. पूर्वजांनी दिलेला वसा आणि ग्रामदैवताला दिलेले अढळ स्थान जपण्यासाठी, गावाचा कारभार चालवण्यासाठी जी वहिवाट ठरवून दिली आहे, त्याप्रमाणे आजही ग्रामस्थ वाटचाल करत आहेत. यात आजवर कोणताही अडसर आलेला नाही आणि सर्व रीतिरिवाज निर्विघ्नपणे पार पडतात, असे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती मांगल्याचे वरदान आहे, या जाणिवेने उपस्थित गावप्रमुख पोटतिडकीने बोलत होते. सर्वच गावप्रमुखांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आपापल्या गावात कोणतीही समस्या उद्‍भवणार नाही, अशी ग्वाही दिली. उत्सव काळात प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखून वागतो आणि गावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो, म्हणूनच या परंपरा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावप्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बीट अंमलदार वेळवणकर यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. सोशल नेटवर्कचा गैरवापर करून एखादी व्यक्ती गावाबाहेर राहून गावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते वेळीच रोखले पाहिजे. उत्सव काळात लावलेले फलक कोणत्याही समुदायाच्या किंवा व्यक्तीच्या भावना दुखावणारे नसतील, याची काळजी घ्यावी. घरोघरी होत असलेल्या देवभेटी दरम्यान पालखीतील मौल्यवान दागिन्यांची व मूर्तीची योग्य ती देखभाल आणि खबरदारी घ्यावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
----
कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही
गावप्रमुखांनी शिमगोत्सवासाठी गावात पोषक वातावरण असल्याचे सांगितले. काही समस्या उद्‍भवल्यास त्या सामोपचाराने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही ग्रामस्थांनी दिले. या शिमगोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पोलीस यंत्रणेवर ताण पडणार नाही, याची खात्री गावप्रमुख, जबाबदार ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com