पेढे परशुराममधील इनामी जमीन शेतकऱ्यांची नावे करा
इनामी जमीन शेतकऱ्यांची नावे करा
शेखर निकम ःमहसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे पेढे मागणी, पेढे परशुराम येथील प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः तालुक्यातील पेढे परशुराम येथील इनामी जमिनी या वंशपरंपरेने पिढ्यानपिढ्या स्थानिक शेतकरी (कुळ) प्रत्यक्षात कसत आहेत. मात्र, त्या शेतकऱ्यांची सातबारावर अजूनही नावे लागलेली नाहीत. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर बावनकुळे यांनी निकम यांना बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिल्यामुळे प्रलंबीत प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झालेली आहे.
श्रीदेव भार्गवराम देवस्थानाचे नाव १९७२ च्या फेरफारमध्ये सातबारावर नोंदविण्यात आले होते. ज्यामुळे प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या कुळ शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात पेढे परशुराम येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने, उपोषणे व सातत्याने शासनाकडे निवेदने दिली आहेत. १५ ऑगस्ट २०१७ रोजी चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला होता. त्यानंतर ३१ जुलै २०१८ रोजी तत्कालीन महसूल मंत्री, जिल्हाधिकारी रत्नागिरी व उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्या उपस्थितीत पेढे परशुराम येथील कुळ शेतकरी व देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली. सदर बैठकीत राष्ट्रीय महामार्ग चौपद्रीकरणासाठी मिळणाऱ्या मोबदल्यापैकी १० टक्के हिस्सा कुळ शेतकऱ्यांना व १० टक्के देवस्थानास देण्याबाबत निर्णय व आदेशही झाले.
तत्कालीन मंत्री यांनी ३ जून २०२१ रोजी माजी खासदार विनायक राऊत, मंत्रालयस्तरीय आयुक्त, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी चिपळूण, प्रकल्पग्रस्त शेतकरी (कुळ) संघर्ष समितीचे पदाधिकारी (सद्याचे नाव शेतकरी उत्कर्ष समिती, पेढे परशुराम) व देवस्थानचे ट्रस्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्येही धोरणात्मक व सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्या बैठकींमध्ये निर्णय होऊनही आजपर्यंत कोणताही ठोस शासन निर्णय अथवा शासकीय आदेश निर्गमित झालेला नाही. १९५० साली देव भार्गवराम ट्रस्टची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी झाली. परंतु स्वातंत्र्य पूर्व काळापासून या जमीन कुळ कसत असून आज देखील सर्व जमीनींवर कुळांची वहिवाट आहे. १९७२ मध्ये १२०९ च्या फेरफारने पेढे पर्शुराम गावातील सर्व जमीनीला देव भार्गवराम अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देव भार्गवराम हे नाव रद्द करुन सदर कुळ वहिवाट जमीनीला कुळ मालक असण्याबाबत आदेश व्हावा, अशी या वंशपरंपरेने पिढ्यानपिढ्या वहिवाट करणाऱ्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
------
१०० टक्के मोबदला द्या
हा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या कुळ शेतकऱ्यांच्या नावावर सातबाराच्या उताऱ्यावर नावे नोंदविणे व त्यांना १०० टक्के मोबदल्याचा हक्क मिळणे अत्यावश्यक आहे. याबाबत शासनस्तरावर तातडीने सकारात्मक धोरण ठरवून संबंधित शासन निर्णय निर्गमित करावा, जेणेकरून पेढे परशुराम येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. यासंदर्भात तत्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

