बोरिवली शिंदी बसफेरी सुरू
बोरिवली-शिंदी
बसफेरी सेवेत
खेड : शिमगोत्सवासाठी शुक्रवारपासून (ता. २७) बोरिवली-ठाणे-शिंदी बसफेरी धावणार आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ही बस बोरिवली येथून रात्री ९ वाजता सुटणारी बस ठाणे, कळवा, रबाळे, नेरूळ, कोकणभवन, खारघर, कामोठे, पनवेल, पेण, रामवाडी, माणगाव मार्गे शिंदीला पोहोचेल. बसफेरीचे आरक्षणही खुले झाले आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौरभ मोरे यांनी केले आहे.
खेडमध्ये बीएसएनएल
सेवेचा फज्जा
खेड : शहरासह ग्रामीण भागात बीसएसएनएलच्या मोबाईल सेवेचा पुरता फज्जा उडाला आहे. सेवेतील व्यत्ययाबाबत तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे. विशेषतः खाडीपट्ट्यात तीन ते चार दिवस गायब होणाऱ्या सेवेमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांची पावले पुन्हा बीएसएनएल सेवेकडे वळली होती. अनेक ग्राहकांनी पुन्हा बीएसएनएलची सेवा खरेदी करणे पसंत केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही क्षणी सेवेत व्यत्यय येत असल्याने ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे.
बियाणी बालमंदिरात
चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिरामध्ये गोदावरीदेवी बियाणी यांच्या स्मृती दिनानिमित्त चित्रकला व रंग भरण स्पर्धा घेण्यात आली. आनंद बियाणी व अर्चना बियाणी यांचा भारत शिक्षण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ.बियाणी यांनी विविध उपक्रम घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने आनंद व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या वेळी श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, राजेंद्र कदम, संजय चव्हाण, सतीश दळी, सनातन रेडीज, प्रबंधक विनायक हातखंबकर, दादा वणजु, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, करसल्लागार रसिकलाल शहा उपस्थित होते. समर्थ भारत अभियान राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा नार्वेकर यांनी केले. अपर्णा गोगटे यांनी आभार मानले.

