बागायतदारांना मदतीचा हात द्या

बागायतदारांना मदतीचा हात द्या

Published on

27125

बागायतदारांना मदतीचा हात द्या

केसरकर : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
आमदार केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात जिल्ह्यातील शेतीची गंभीर स्थिती मांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने आंबा आणि काजू या नगदी पिकांवर अवलंबून आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर मोहोर आल्याने बागायतदारांच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र, उशिरापर्यंत सुरू राहिलेला पाऊस आणि त्यानंतर तापमानात झालेल्या सततच्या बदलांमुळे मोहोर काळवंडला. परिणामी अपेक्षित फळधारणा झाली नाही आणि हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले.
जिल्ह्यात वारंवार अवकाळी पाऊस होत असून हे शेतकऱ्यांसाठी ‘अस्मानी संकट’ ठरत आहे. नुकताच जिल्ह्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उरलेल्या बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत जाहीर करून त्यांना या संकटातून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार केसरकर यांनी केली आहे.
---
जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी
सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांनी खते, औषधे, कीटकनाशके, बागांचे व्यवस्थापन आणि मशागतीच्या खर्चासाठी सहकारी सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर राष्ट्रीयीकृत व शासकीय बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली आहेत; मात्र, पिके हातची गेल्याने ही कर्जे कशी फेडावीत, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com