कुडाळात पायाभूत सुविधांसाठी तरतूद
27132
कुडाळात पायाभूत सुविधांसाठी तरतूद
नगरपंचायत सभा; शिलकी अंदाजपत्रक मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ : येथील नगरपंचायतीच्या विशेष सभेत २०२६-२७ आर्थिक वर्षासाठीच्या शिलकी रकमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर केले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. लेखापाल स्वप्नील पाटील यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक रक्कम ३७ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४८ रुपये आहे. एकूण महसुली जमा १० कोटी ३० लाख ५२ हजार ५०० रुपये, तर महसुली खर्च १० कोटी २७ लाख ४१ हजार ७४९ रुपये आहे. भांडवली जमा २५ कोटी ४४ लाख ५६ हजार ५०० रुपये असून भांडवली खर्च २५ कोटी ३२ लाख १८ हजार ५०० रुपये इतका आहे. अखेरीस ३७ कोटी ९७ लाख ०८ हजार ५९९ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सभागृहाने सर्वानुमते संमत केले.
-------
दिव्यांग, ज्येष्ठांसाठीही तरतूद
या अंदाजपत्रकात आरोग्य, पाणीपुरवठा, क्रीडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. तसेच चौक सुशोभीकरण, मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शहर प्रवेशद्वार उभारणी, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, कचरा डेपो, नाट्यगृह बांधकाम, हायमास्ट दिवे खरेदी, पाणी योजनांसाठी निधी, सक्शन मशीन खरेदी, रस्ता दुरुस्ती, नवीन कचरा संकलन वाहने, भाजी मार्केट, सुसज्ज जिमखाना, नाना-नानी पार्क, बायोगॅस प्लांट, नवीन उद्यान, मलनिःस्सारण योजना, मच्छी मार्केट आदी विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. हे अंदाजपत्रक नागरिकांच्या अवलोकनासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

