बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी कार्यशाळा
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी कार्यशाळा
सावंतवाडी ः यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२६ ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा महेश ट्युटोरियल्स, मुंबई व एसकेई कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने रविवारी (ता. १) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भोसले नॉलेज सिटी येथील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडणार आहे. शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. संतोष शर्मा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच प्रा. राहुल घाडगे (गणित), प्रा. दीपक आमुंदकर (रसायनशास्त्र) आणि प्रा. सचिन कदम (भौतिकशास्त्र) हे विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा विनामूल्य आहे. सावंतवाडी बसस्थानकाजवळून महाविद्यालयापर्यंत संस्थेतर्फे बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २७ फेब्रुवारीपूर्वी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
...........................
बांद्यात उद्या ‘मराठी भाषा गौरव दिन’
बांदा ः मराठी भाषेचा गौरव आणि जतन करण्याच्या उद्देशाने थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयामध्ये शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ४.३० वाजता ‘माझ्या आठवणीतील कविता’ या संकल्पनेवर आधारित कविता गायनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मराठी साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या आवडत्या कविता सादर कराव्यात, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. ज्यांना आपली कविता सादर करावयाची आहे, त्यांनी आपली नावे नट वाचनालयात उद्यापर्यंत (ता. २६) नोंदवावीत, असेही कळविले आहे.
---
मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे यश
सावंतवाडी : एस.ओ.एफ. नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेमध्ये येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यामध्ये सीताराम मेस्त्री, संस्कृती गावकर, चिदानंद रेडकर, आदिल शेख, पुष्कर गावडे, हर्ष राऊळ व करुणा बाईत या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोजा फर्नांडिस, उर्मिला मिनेझिस, रोवीना पिंटो, नतालीन सालदान्हा या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

