सव्वाशे केंद्रप्रमुख पदांसाठी शिक्षकांमध्ये मोठी चुरस

सव्वाशे केंद्रप्रमुख पदांसाठी शिक्षकांमध्ये मोठी चुरस

Published on

केंद्रप्रमुख निकालाकडे शिक्षकांचे लक्ष
१२५ जागा रिक्त ; पदोन्नतीच्या संधीमुळे मोठी चुरस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे लक्ष सध्या केंद्रप्रमुख भरतीच्या निकालाकडे आहे. जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या १२५ जागा रिक्त असून, या पदावर पदोन्नतीने जाण्यासाठी शिक्षकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राज्यभरातून या परीक्षेसाठी ४६ हजारांहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३८ हजार ५५९ शिक्षकांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे.
रत्नागिरीच्या शिक्षकांसाठी ही मोठी संधी आहे, कारण नियमानुसार जो शिक्षक ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे, त्याला त्याच जिल्ह्यातील रिक्त पदावर नियुक्ती मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर बदली होण्याची भीती नसल्याने अनेकांनी या परीक्षेसाठी जीवतोड मेहनत घेतली जात आहे. केंद्र प्रमुखांची ही भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडलेली होती. २०२३ मध्येही यासाठी अर्ज भरून घेण्यात आले होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे ती परीक्षा होऊ शकली नव्हती. अखेर नोव्हेंबरमध्ये नव्याने नोंदणी प्रक्रिया राबवून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा पार पडली. आता एका जागेसाठी किमान १५ उमेदवार स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा परिषदेने घेतलेली ही परीक्षा एकूण २०० गुणांची होती, ज्यामध्ये बुद्धिमत्ता, अभियोग्यता आणि शालेय शिक्षणातील विविध नियम व नवीन शैक्षणिक धोरणांवर आधारित प्रश्नांचा समावेश होता.
रत्नागिरीतील शिक्षकांसाठी आता निकालाची प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केल्यानुसार, सध्या निकालाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची १२५ पदे भरली गेल्यास त्याचा सकारात्मक परिणाम प्राथमिक शिक्षणाच्या प्रशासकीय कामकाजावर होईल. यामुळे शाळांचे पर्यवेक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीला मदत होणार असल्याने, केवळ उमेदवार शिक्षकच नव्हे तर संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com