मालवण येथे शिक्षकांसाठी ८ मार्चला व्हॉलीबॉल स्पर्धा
मालवण येथे शिक्षकांसाठी
८ मार्चला व्हॉलीबॉल स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : दैनंदिन अध्यापन, प्रशासकीय कामाचा वाढता व्याप आणि जबाबदाऱ्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ आयोजित आणि मालवण तालुका माध्यमिक अध्यापक संघ पुरस्कृत जिल्हास्तरीय ‘सेमी व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६’ (पुरुष गट) चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ८ मार्चला सकाळी १० वाजता वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असणारे आणि ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नेमणूक झालेले सर्व कर्मचारी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत केवळ पहिल्या १६ संघांना प्रवेश दिला जाईल. खेळाडूंनी स्वतःच्याच तालुक्यातून खेळणे बंधनकारक आहे. एका तालुक्यातून एकापेक्षा जास्त संघांना प्रवेश मिळू शकेल. स्पर्धेतील विजेत्या पहिल्या चार संघांना अनुक्रमे २ हजार ५००, १ हजार ५००, १ हजार, १ हजार रुपये व चषक, याशिवाय सर्वोत्तम खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट सर्व्हिसमन, टॉसर आणि डिफेंडर यांनाही गौरवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सोय केली आहे. अधिक माहितीसाठी अजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

