''जीवन आनंद''ची विद्यार्थ्यांना हाक

''जीवन आनंद''ची विद्यार्थ्यांना हाक

Published on

swt267.jpg
27307
देवगड ः येथील महाविद्यालयात प्रा. विजयकुमार कुनुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

‘जीवन आनंद’ची विद्यार्थ्यांना हाक
दातृत्वाचे आवाहन ः देवगड महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः येथील महाविद्यालयाच्या समूह सहभाग कार्यक्रमाअंतर्गत समाजातील वंचित आणि निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संस्थेच्या वतीने महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले. प्रा. विजयकुमार कुनुरे यांनी संस्थेचे संस्थापक संदीप परब यांचे स्वागत करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढून महाविद्यालयाच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
सुरुवातीला उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी, अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती व समाजातील गरजू, निराधार, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, अन्न व निवारा या मूलभूत गरजांसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवन आनंद संस्थेंतर्गत चालविण्यात येणार्‍या नऊ आश्रमांची व आश्रमांमध्ये निराधार बांधवांची कशाप्रकारे देखभाल केली जाते याबद्दल सचित्र माहिती दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना गरजू बांधवांसाठी आर्थिक तसेच वस्तूरुपाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून संस्थेच्या पुढील उपक्रमांत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली. शां. कृ. पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र मुंबरकर यांनी अशा उपक्रमांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. सुहास खरात यांनी आभार मानले. प्रल्हाद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com