१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित

Published on

महावितरणची थकबाकीदारांवर कारवाई
परिमंडलात २५ कोटी थकीत ; १,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : विजेचा वापर करूनही नियमित देयके न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रत्नागिरी परिमंडलाअंतर्गत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा विविध वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे तब्बल २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे गेल्या दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी त्वरित देयके भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
रत्नागिरी परिमंडलात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक असून, त्यांच्याकडे १४ कोटी ५१ लाख रुपये थकीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात ४३ हजार ८४३ ग्राहकांकडे ५.८४ कोटी, चिपळूण विभागात २४ हजार ६४८ ग्राहकांकडे ३.३१ कोटी तर खेड विभागात २६ हजार ३७५ ग्राहकांकडे ३.६१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीपोटी जिल्ह्यातील ७०८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ६.१२ कोटी, तर कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ७.०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे जिल्ह्यातील ४७४ ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे.
मार्च अखेर जवळ येत असल्याने थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे मार्च २०२६ अखेरपर्यंत सर्व शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. वेळेत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे आणि वीज खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---
डिजिटल पेमेंटवर विशेष सवलत
महावितरणने ग्राहकांना घरबसल्या बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि ‘महावितरण मोबाइल अॅप’ची सुविधा दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने बिल भरल्यास ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के सवलत दिली जाते तसेच पाच हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असलेल्या लघुदाब ग्राहकांसाठी आरटीजीएस (RTGS)किंवा एनईएफटी (NEFT)द्वारे देयक भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com