पक्षी गणनेत सिंधुदुर्ग पुन्हा अव्वल

पक्षी गणनेत सिंधुदुर्ग पुन्हा अव्वल

Published on

swt2613.jpg
27329
पक्षी निरीक्षण करताना पक्षी अभ्यासक.
swt2616.jpg
27331
‘लार्ज हॅक कुकू’ हा दुर्मीळ, कोकिळ वर्गीय प्रवासी पक्षी.
swt2615.jpg
27330
चौकुळ ः येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलीच नोंद झालेला ''एशियन टिट''.
swt2614.jpg

तिलारी ः येथे नोंद झालेला ''रेड क्रेस्टेड पोचार्ड'' हे दुर्मीळ प्रवासी बदक.

पक्षी गणनेत सिंधुदुर्ग पुन्हा अव्वल
राज्यात आघाडी : जिल्ह्यातून तब्बल ३१५ प्रजातींची नोंद
नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः जागतिक स्तरावर दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ''ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट'' या पक्षी गणनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने यावर्षीही दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल स्थान पटकावले. जिल्ह्यातून तब्बल ३१५ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली असून, जैवविविधतेच्या दृष्टीने हा विक्रम मानला जात आहे. ''लार्ज हॅक कुकू'', ''एशियन टिट'' व ''रेड क्रेस्टेड पोचार्ड'' या पक्ष्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलीच नोंद झाली आहे.
संपूर्ण राज्यात पुणे जिल्हा २६७ प्रजातींसह दुसऱ्या, तर रायगड जिल्हा २१० प्रजातींसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. राज्यभरातून एकूण ४१४ पक्षी प्रजातींच्या नोंदी करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचा या उपक्रमात सहभाग होता.
जगभर १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश पक्ष्यांची संख्या व प्रजातींची अचूक माहिती संकलित करणे, हा आहे. या माध्यमातून पक्ष्यांच्या संख्येतील बदल, स्थलांतराच्या पद्धती व पर्यावरणीय परिणामांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, हाही या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. हा कार्यक्रम कॉर्नल लॅब ऑफ ओर्निथोलॉजी, नॅशनल औडूबॉन सोसायटी आणि बर्डलाईफ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. दरवर्षी जागतिक स्तरावर फेब्रुवारीत ही मोहीम आयोजित केली जाते. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी सहभागी होऊन आपल्या परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण करतात व ''ई बर्ड'' या संकेतस्थळावर त्याची नोंद करतात. जिल्ह्यात पक्षी निरीक्षकांची संख्या कमी असूनही सर्व सहभागींनी चार दिवसांत विक्रमी संख्येने पक्ष्यांच्या नोंदी करत जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर ठेवले आहे.
जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांनी यंदा उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत राज्यात ठसा उमटविला आहे. ओरोस येथील सचिन प्रभू यांनी राज्यात सर्वाधिक २६४ प्रजातींची वैयक्तिक नोंद करत अव्वल स्थान मिळविले. त्याखालोखाल दोडामार्गचे मकरंद नाईक (२३३) आणि बांदा येथील प्रवीण सातोसकर (२३०) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत.
सर्वाधिक नोंदी करणारे निरीक्षक आणि कंसात त्यांनी केलेल्या नोंदणीची संख्या अशी: सचिन प्रभू (२६४), मकरंद नाईक (२३३), प्रवीण सातोसकर (२३०), कौस्तुभ कोरगावकर (२०८), पार्थ भिसे (२०६), भाग्यश्री परब (१८३), डॉ. श्रीकृष्ण मगदूम (१३६), गार्गी मिश्रा (१३०), ओंकार गावकर (१२४), अभिषेक राणे (१२२).
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून ४० पक्षी निरीक्षकांनी गणनेत सहभाग घेतला होता. वानोशी, बांदा, तिलारी, तळकट, शिरोडा, मालवण, मोचेमाड, देवगड, चिपी, ओरोस आणि पाट तलाव या ठिकाणी मिळून ४५ विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही उल्लेखनीय कामगिरी केवळ सांख्यिक यश नसून, जिल्ह्याच्या समृद्ध निसर्गसंपदा, पक्षी वैविध्य आणि पर्यावरणपूरक जनजागृतीचे द्योतक आहे. राज्याच्या जैवविविधतेच्या नकाशावर सिंधुदुर्गने आपले स्थान अधिक भक्कम केल्याचे या पक्षी गणनेतून अधोरेखित झाले आहे.
..................
चौकट
तीन प्रजातींची पहिली नोंद
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच तीन नवीन पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. यात तळकट वनउद्यान येथे प्रवीण सातोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ''लार्ज हॅक कुकू'' या दुर्मीळ, कोकीळ वर्गीय प्रवासी पक्ष्याची नोंद केली आहे. मकरंद नाईक यांनी तेरवण मेढे धरण परिसरात ''रेड क्रेस्टेड पोचार्ड'' या आकर्षक प्रवासी बदकाची नोंद केली आहे. चौकुळ येथे प्रवीण सातोसकर यांनी ''एशियन टिट'' या लहान आकाराच्या पक्ष्याची नोंद केली. या नव्या नोंदींमुळे सिंधुदुर्गच्या समृद्ध पक्षी वैविध्याची प्रचिती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. येथील दुर्मीळ वसनसंपदा व जैवविविधता यामध्ये आता पक्षी प्रजातींची देखील भर पडली आहे. यामुळे निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे.
....................
चौकट
संस्थांचा सक्रिय सहभाग
या उपक्रमात जिल्ह्यातील विविध निसर्गप्रेमी संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये वाइल्ड कोकण (सावंतवाडी), मृगया नेचर एक्सपीडिशन (आंबोली), वानोशी फॉरेस्ट होम स्टे (कुडासे), वनश्री फाउंडेशन (दोडामार्ग) आणि युथ बिट फॉर क्लायमेट चेंज (मालवण) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
.....................
कोट
अत्यंत दुर्मीळ व धोकादायक प्रजातीमध्ये गणल्या जाणाऱ्या अनेक पक्ष्यांचा अधिवास हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्याने येथील जैवविविधतेत भर पडली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनाला भविष्यात खूप मोठी संधी आहे.
- प्रवीण सातोसकर, पक्षी निरीक्षक
.....................
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वार्षिक पक्षी नोंदी
२०२४-३८५
२०२५-२८९
२०२६-३१५
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com