पक्षी गणनेत सिंधुदुर्ग पुन्हा अव्वल
27329
निरीक्षण करताना पक्षी अभ्यासक.
27331
‘लार्ज हॅक कुकू’ हा दुर्मीळ, कोकिळ वर्गीय प्रवासी पक्षी.
27330
चौकुळ ः येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलीच नोंद झालेला ‘एशियन टिट’.
27360
तिलारी ः येथे नोंद झालेला ‘रेड क्रेस्टेड पोचार्ड’ हे दुर्मीळ प्रवासी बदक.
पक्षी गणनेत सिंधुदुर्गची पुन्हा अव्वल भरारी
राज्यात सलग तिसऱ्यांदा प्रथम; जिल्ह्यात तब्बल ३१५ प्रजातींची नोंद
नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः जागतिक स्तरावर दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल स्थान पटकावले. जिल्ह्यातून तब्बल ३१५ प्रजातींची नोंद झाली असून, जैवविविधतेच्या दृष्टीने हा विक्रम मानला जात आहे. ‘लार्ज हॅक कुकू’, ‘एशियन टिट’ व ‘रेड क्रेस्टेड पोचार्ड’ या पक्ष्यांची जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली आहे.
पुणे जिल्हा २६७ प्रजातींसह दुसरा, तर रायगड २१० प्रजातींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात सर्व ३६ जिल्ह्यांचा सहभाग होता व एकूण ४१४ पक्षी प्रजातींच्या नोंदी झाल्या. जगभर १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या उपक्रमाचा उद्देश पक्ष्यांची संख्या व प्रजातींची अचूक माहिती संकलित करणे, हा आहे. यातून संख्येतील बदल, स्थलांतराच्या पद्धती व पर्यावरणीय परिणामांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, हाही प्रमुख हेतू आहे. कॉर्नल लॅब ऑफ ओर्निथोलॉजी, नॅशनल औडूबॉन सोसायटी आणि बर्डलाईफ इंटरनॅशनल यांच्यातर्फे दरवर्षी जागतिक स्तरावर फेब्रुवारीत ही मोहीम होते. यामध्ये नागरिक, पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी सहभागी होऊन त्यांच्या परिसराचे निरीक्षण करतात व ‘ई बर्ड’ या संकेतस्थळावर त्याची नोंद करतात. जिल्ह्यात पक्षी निरीक्षकांची संख्या कमी असूनही सर्व सहभागींनी चार दिवसांत विक्रमी संख्येने पक्ष्यांच्या नोंदी करत जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर ठेवले आहे.
ओरोस येथील सचिन प्रभू यांनी राज्यात सर्वाधिक २६४ प्रजातींची वैयक्तिक नोंद करत अव्वल स्थान मिळविले. त्याखालोखाल दोडामार्गचे मकरंद नाईक (२३३) आणि बांदा येथील प्रवीण सातोसकर (२३०) यांचीही उल्लेखनीय कामगिरी झाली. नोंदी करणारे अन्य निरीक्षक (कंसात त्यांनी नोंदवलेली संख्या) : कौस्तुभ कोरगावकर (२०८), पार्थ भिसे (२०६), भाग्यश्री परब (१८३), डॉ. श्रीकृष्ण मगदूम (१३६), गार्गी मिश्रा (१३०), ओंकार गावकर (१२४), अभिषेक राणे (१२२).
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून ४० निरीक्षकांनी सहभाग घेतला होता. वानोशी, बांदा, तिलारी, तळकट, शिरोडा, मालवण, मोचेमाड, देवगड, चिपी, ओरोस आणि पाट तलाव या ठिकाणी मिळून ४५ विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात आले.
जिल्ह्याची ही उल्लेखनीय कामगिरी केवळ सांख्यिक यश नसून, जिल्ह्याच्या समृद्ध निसर्गसंपदा, पक्षी वैविध्य आणि पर्यावरणपूरक जनजागृतीचे द्योतक आहे. राज्याच्या जैवविविधतेच्या नकाशावर सिंधुदुर्गने आपले स्थान अधिक भक्कम केल्याचे या पक्षी गणनेतून अधोरेखित झाले आहे.
चौकट
तीन प्रजातींची पहिली नोंद
यंदा जिल्ह्यात प्रथमच तीन नवीन पक्षी प्रजातींची नोंद झाली. यात तळकट वनउद्यान येथे प्रवीण सातोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लार्ज हॅक कुकू’ या दुर्मीळ, कोकीळवर्गीय प्रवासी पक्ष्याची नोंद केली. मकरंद नाईक यांनी तेरवण मेढे धरण परिसरात ‘रेड क्रेस्टेड पोचार्ड’ या आकर्षक प्रवासी बदकाची नोंद केली. चौकुळ येथे प्रवीण सातोसकर यांनी ‘एशियन टिट’ या लहान आकाराच्या पक्ष्याची नोंद केली. या नव्या नोंदींमुळे सिंधुदुर्गच्या समृद्ध पक्षी वैविध्याची प्रचिती पुन्हा एकदा जगासमोर आली. येथील दुर्मीळ वसनसंपदा व जैवविविधता यामध्ये आता पक्षी प्रजातींची देखील भर पडली आहे.
चौकट
संस्थांचा सक्रिय सहभाग
या उपक्रमात जिल्ह्यातील विविध निसर्गप्रेमी संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. वाइल्ड कोकण (सावंतवाडी), मृगया नेचर एक्सपिडिशन (आंबोली), वानोशी फॉरेस्ट होम स्टे (कुडासे), वनश्री फाउंडेशन (दोडामार्ग) आणि युथ बिट फॉर क्लायमेट चेंज (मालवण) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
कोट
अत्यंत दुर्मीळ व धोकादायक प्रजातींमध्ये गणल्या जाणाऱ्या अनेक पक्ष्यांचा अधिवास जिल्ह्यात सापडल्याने येथील जैवविविधतेत भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनाला भविष्यात खूप मोठी संधी आहे.
- प्रवीण सातोसकर, पक्षी निरीक्षक
जिल्ह्यातील वार्षिक पक्षी नोंदी
२०२४-३८५
२०२५-२८९
२०२६-३१५
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

